नवीन साडे पाचशे सीसीटीव्ही स्पॉटची पुणर्र पाहणी; पोलीस आयुक्तांनी केली समिती स्थापन

नवीन आवश्यक असणाऱ्या साडे पाचशे सीसीटीव्हींच्या स्पॉटची पाहणी पुणे पोलिसांनी पुन्हा सुरू केली आहे. शहराच्या बदलत्या स्वरूपात या सीसीटीव्हींची आवश्यकता कशी हवी, आणखी किती सीसीटीव्ही आवश्यक आहेत. तसेच सध्यस्थितील हे सीसीटीव्ही कसे असावे व कोणत्या अँगलने असावे यासाठी ही पाहणी केली जात आहे.

पुणे : शहरात नवीन आवश्यक असणाऱ्या साडे पाचशे सीसीटीव्हींच्या स्पॉटची पाहणी पुणे पोलिसांनी पुन्हा सुरू केली आहे. शहराच्या बदलत्या स्वरूपात या सीसीटीव्हींची आवश्यकता कशी हवी, आणखी किती सीसीटीव्ही आवश्यक आहेत. तसेच सध्यस्थितील हे सीसीटीव्ही कसे असावे व कोणत्या अँगलने असावे यासाठी ही पाहणी केली जात आहे. वाहतूक शाखा, गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलीस यांच्याकडून ही पाहणी केली जात आहे. पोलीस आयुक्तांनी यासाठी एक समिती स्थापन केली असून, त्याद्वारे शहरातील सर्व सीसीटीव्हींची पाहणी केली जाणार आहे. नुकतीच परिमंडळ एकमधील महत्वाच्या ठिकाणांची पाहणी समितीद्वारे करण्यात आली.

शहरात १००० सीसीटीव्ही

पुणे हे सीसीटीव्हीच्या निगरानीखाली देशातील पहिले शहर म्हणून ओळखले जाते. पिंपरी-चिंचवड आणि पुणे अशा ४०० ठिकाणांवर एकूण प्रथम १ हजार ३०० सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. या सीसीटीव्हींची देखभाल व पाहणी पुणे पोलिसांकडे आहे. मात्र पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर त्यातील ३०० सीसीटीव्ही त्या आयुक्तालयाअंतर्गत गेले. सध्यस्थितीत शहरात १००० सीसीटीव्ही आहेत. परंतु, शहराच्या मानाने ते कमी आहेत.

दरम्यान, पुण्याचा विस्तार वाढत आहे. विस्तार वाढत असतानाच त्यात बदल देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. मेट्रो व उड्डाण पुलांचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे या कॅमेऱ्यांचे नजर हवी तशी पोलिसांना नसल्याचे काही ठिकाणांवरून स्पष्ट झाले आहे. तर, आवश्यक सीसीटीव्हींची देखील शासनाकडून पाहणी करण्यात आली होती. ३ वर्षांपुर्वी झालेल्या एका पाहणीत नवीन साडे पाचशे ठिकाणांवर आणखी सीसीटीव्ही आवश्यक असल्याचे पाहणीतून समोर आले होते. त्याबाबत प्रस्ताव देखील तयार करून शासनास दिला गेला होता.

शहरात गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ

दरम्यान, शहरात गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच, वाहतूकीत देखील प्रचंड कोंडी आहे. कायदा सुव्यवस्थेचा अधून मधून प्रश्न निर्माण होतो. यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एक समिती स्थापन करून पुन्हा आवश्यक सीसीटीव्ही तसेच सध्यस्थितीतील सीसीटीव्हींची पाहणी करून आवश्यक ते बदल करण्याबाबतचा अहवाल मागविला आहे. त्यानूसार समितीने परिमंडळ एकमधील खंडोजीबाबा चौकातील सीसीटीव्हींची पाहणी केली. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजय मगर, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल पवार तसेच वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त, स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या स्कॉडचे अधिकारी उपस्थित होते.

तीन दृष्टीने पाहणी…

शहरातील वाढती गुन्हेगारी, वाहतूक व्यवस्था तसेच कायदा व सुव्यवस्था यादृष्टीने ही पाहणी केली जात आहे. आवश्यक ठिकाणी तसेच आवश्यक सीसीटीव्हींची संख्या यातून ठरवली जाणार आहे. त्याचा सविस्तर अहवाल पोलीस आयुक्तांना सादर केला जाणार आहे. हा अहवाल प्रशासनाला सादरकरून नवीन सीसीटीव्ही बसिवले जाणार आहेत.

महिला सुरक्षेच्या दृष्टीनेही पाहणी…

शहरातील सर्व मॉल, शाळा- महाविद्यालये तसेच गर्दीचे व महत्वाच्या ठिकाणी देखील पाहणी केली जाणार आहे. तसेच महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून पाहणीकरून त्याठिकाणी सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत.

स्ट्रीट क्राईमच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही

शहरातील स्ट्रीट क्राईमच्या वाढता आलेख पाहता पुण्यात इन व आऊट होणाऱ्या ठिकाणांवर सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. वाहन चोरी, घरफोड्या तसेच चैन स्नॅचिंग व मोबाईल स्नॅचिंगनुसार पोलिसांकडून स्पॉट निवडले जाणार आहेत. त्यानुसार अशा ठिकाणी आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत.

मेट्रो व उड्डाण पुलामुळे सीसीटीव्हींचा फायदाच नाही…

शहरात मेट्रोचे व नवीन उड्डाण पुलांचे कामकाज तेजीत सुरू आहे. त्यामुळे सध्यास्थितीत असलेले काही सीसीटीव्हींतून पोलिसांना आवश्यक माहिती मिळत नसल्याने त्यांचे ठिकाण बदलले जाणार आहे. तसेच, शहरातील सर्वच सीसीटींव्हचे अँगलही चेक केले जात आहेत. येरवड्यातील गुंजन चौक तसेच विद्यापीठातील एका ठिकाणचे सीसीटीव्हीत उपयुक्त असे काहीच कैद होत नसल्याने पोलीस यावर लक्ष ठेवून सर्वच सीसीटीव्ही चेक करत आहेत.