चार्जिंग स्टेशनसाठी पुन्हा फेरनिविदा, २२ ठिकाणी उभारणार स्टेशन; कोणती आहेत ठिकाणे ?

पिंपरी शहरातील नागरिकांना इलेक्‍ट्रिक वाहने चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेने २२ ठिकाणी खाजगी एजन्सीद्वारे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन केले आहे.

  पिंपरी : पिंपरी शहरातील नागरिकांना इलेक्‍ट्रिक वाहने चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेने २२ ठिकाणी खाजगी एजन्सीद्वारे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन केले आहे. चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी दीड वर्षात तीनदा निविदा प्रक्रिया राबवून खासगी एजन्सींचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता निविदेमधील अटी- शर्तीत बदल करून महिन्याअखेर चौथ्यांदा निविदा काढली जाणार आहे. शहरात सुमारे ३० हजार ई वाहने असल्याची पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंद आहे. या इ वाहन वापरणाऱ्यांंना वाहने चार्जिंग करण्यासाठी पालिकेमार्फत सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

  महापालिकेकडून जागा उपलब्ध होणार

  महापालिकेमार्फत इव्ही चार्जिंग स्टेशनसाठी २२ ठिकाने निश्चित केली आहेत. खासगी एजन्सींकडून स्वत: बांधा आणि संचलित करा (बिल्ड ऑपरेट ऍन्ड ओन) मॉडेलवर इलेक्‍ट्रिक वाहने चार्जिंग सुविधा वाजवी दराने उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. या एजन्सींना महापालिकेकडून फक्त जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या जागेवर ८ वर्षासाठी स्वत:च्या खर्चाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा घेणे, इव्ही चार्जिंग स्टेशन उभारणे आणि चालन व देखभाल करणे या बाबी एजन्सीने करणे आवश्‍यक आहे.

  या एजन्सीने ग्राहकांसाठी कमाल मर्यादा दरावरील महसूली वाटणीतील काही प्रमाणात रक्कम महापालिकेला या माध्यमातून देणे आवश्‍यक आहे. महसूली वाटणीतील अधिकतम रक्कम देणाऱ्या एजन्सीला काम देण्याचे नियोजन पालिकेचे आहे. मात्र, गेल्या दीड वर्षात इव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. निविदेमधील जाचक अटींमुळे खासगी एजन्सींकडून प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने आता निविदेमधील अटी-शर्तीत काही बदल करून निविदा काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

  “ही” आहेत २२ ठिकाणे

  महापालिकेने २२ ठिकाणी इव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी जागा निश्‍चित केल्या आहेत. पिंपरी येथील महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात, पिंपरीतील सीट्रस हॉटेल जवळ, दुर्गादेवी टेकडी निगडी, वाहतूकनगरी, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम नेहरुनगर, निसर्ग निर्माण सोसायटी रिलायन्स मार्ट जवळ कोकणे चौक पिंपळे सौदागर, आरटीओ कार्यालय, चिखली, बर्ड व्हॅली संभाजीनगर, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल भोसरी, मलनि:सारण केंद्र चिखली, लांडेवाडी नाशिक रोड-टेल्को रोड जंक्‍शन, भक्ती शक्ती बस टर्मिनल निगडी, बजाज ऍटो जवळ, एच ए कंपनी सब वे जवळ, संत तुकाराम मेट्रो स्टेशनच्या चौथ्या प्रवेशद्वाराजवळ, पी. के चौक, पिंपळे सौदागर, योगा पार्क विबग्योर शाळा पिंपळे सौदागर, राजमाता जिजामाता उद्यान पार्किंग प्रभातनगर, पिंपळे गुरव, संतनगर उद्यान कासारवाडी, बी. डी. किल्लेदार गार्डन, वल्लभनगर, ऍटो क्‍लस्टर, सायन्स पार्क, राजश्री शाहू गार्डन, अशा इव्ही चार्जिंगसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे.