Basmati rice

  पुणे : नवीन हंगामात बासमती तांदळाचे उत्पादन कमी येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे बासमतीचे उत्पादन कमी येणार असल्यामुळे त्यास जादा भाव मिळून शेतकऱ्यांना फायदा हाेईल. त्याचप्रमाणे निर्यात वाढण्याची शक्यता असल्याने बासमती तांदुळाचे भाव तेजीत राहतील, असा अंदाज व्यापारी राजेश शहा यांनी व्यक्त केला आहे.

  यंदा ८० ते ९० लाख टन उत्पादन येण्याचा अंदाज

  यावर्षी देशात बासमती तांदळाचे सर्व प्रकार मिळून ८० ते ९० लाख टन उत्पादन येण्याचा अंदाज, असा अंदाज वर्तवला जात आहे. यापैकी साधारण निम्मा परदेशात निर्यात केला जात असतो. गेल्या आर्थिक वर्षांत बासमती तांदळाची निर्यात ४६ लाख टन झाली आहे. देशातील साधारण ९० लाख टन उत्पादनापैकी ४६ लाख टन बासमती तांदूळ परदेशात निर्यात होत असतो. तर बासमती तांदळाच्या उत्पादनाचा निम्मा देशांतर्गत खप असतो.

  निर्यात दर १२०० डॉलरवरून ९५० डॉलरवर

  सरकारने बासमतीच्या निर्यातीचे दर १२०० डॉलर वरून कमी करून ९५० डॉलरवर आणल्यामुळे यावर्षी निर्यात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर बासमती व बासमती च्या सर्व प्रकारांचे दर पुढील सिझन मध्ये तेजीत राहण्याची शक्यता आहे. नॉन बासमती तांदळाची निर्यातीवर सरकारने यावर्षी संपूर्णपणे बंदी आणल्यामुळे नॉन बासमती तांदळाचे दर स्थानिक पातळीवर वाढणार नाहीत, असा अंदाज शहा यांनी व्यक्त केला.

  गेल्यावर्षी तांदुळाचा न्यूनतम निर्यात दर जास्त ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर खूप मोठे नुकसान झाले होते.  न्युनतम निर्यात दर  वाढविल्यामुळे निर्यातदारांनी गेल्या वर्षी बासमती तांदळाची खरेदी ही काही काळ थांबवली होती. त्यामुळेसुद्धा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. काही काळानंतर न्युनतम निर्यात दर कमी केल्याने निर्यातदारांनी पुन्हा खरेदी सुरु केली आणि त्यानंतर बासमती तांदळाच्या निर्यातीत गेल्या वर्षी सुधारणा झाली होती, असेही शहा यांनी नमूद केले.