शेतीच्या वादातून सख्ख्या भावाने मुलाच्या मदतीने केला खून; दगड, विटांनी केली मारहाण

जुन्या शेतीच्या व घराच्या वादातून सख्ख्या भावाने मुलाच्या मदतीने भावाला दगड, विटांनी मारहाण करत निर्घृण खून केल्याची घटना तालुक्यातील पिरोळा शिवारात घडली.

    सिल्लोड : जुन्या शेतीच्या व घराच्या वादातून सख्ख्या भावाने मुलाच्या मदतीने भावाला दगड, विटांनी मारहाण करत निर्घृण खून केल्याची घटना तालुक्यातील पिरोळा शिवारात घडली. याप्रकरणी आरोपी बाप-लेका विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

    जम्मन त्र्यबंक गोरे (६५ रा. भराडी) असे मयताचे नाव आहे. तर रघुनाथ त्र्यबंक गोरे, कृष्णा रघुनाथ गोरे (रा. भराडी ह.मु.पिरोळा शिवार) अशी आरोपींची नावे आहेत. जम्मन गोरे आणि आरोपींमधील एक जण सख्खे भाऊ असून, वडिलोपार्जित समाईक शेती व घरावरून दोघात वाद होता. दोन्ही भावांची शेती पिरोळा शिवारात गट नं. ८२ मध्ये असून, मयत भराडी येथे तर आरोपी पिरोळा शिवारातील शेतात राहतात.

    शेतात गोरे यांचे वखारीचे काम सुरु असल्याने ते शनिवारी रात्री शेतात झोपण्यासाठी गेले. हीच संधी साधत आरोपींनी मयताच्या डोक्यावर व तोंडावर दगड, विटांनी मारहाण करत गंभीर जखमी केले व पाण्याच्या डबक्यात टाकून निघून गेले. या घटनेची माहिती जम्मन गोरे यांच्या मुलाला रात्रीच मिळाली. त्याने शेतात जाऊन पाहिले असता वडील पाण्याच्या डबक्यात मृत अवस्थेत दिसून आले. त्याने ही माहिती पोलिसांनी दिली.