‘इन्स्टाग्राम’ वरील ओळख पडली महागात; चोरट्यांचा महिलेला ६ लाखांचा गंडा

‘इन्स्टाग्राम’वर झालेली मैत्री एका महिलेला चांगलीच महागात पडली असून, सायबर चोरट्यांनी महागडे गिफ्ट पाठवले असल्याचे सांगत कस्टम चार्ज म्हणून सव्वा सहा लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पुणे : ‘इन्स्टाग्राम’वर झालेली मैत्री एका महिलेला चांगलीच महागात पडली असून, सायबर चोरट्यांनी महागडे गिफ्ट पाठवले असल्याचे सांगत कस्टम चार्ज म्हणून सव्वा सहा लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याप्रकरणी कोंढवे धावडे येथील ४४ वर्षाच्या महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी इन्स्टाग्राम धारकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान घडला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या गृहिणी आहेत. त्यांची फेब्रुवारी २०२२ मध्ये ‘इन्स्टाग्राम’वर एका अनोळखी व्यक्तीशी ओळख झाली. त्या व्यक्तीने ओळख वाढविली. त्यानंतर त्या व्यक्तीने महिलेला व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला. त्यांच्याशी मैत्री केली. त्यांना महागडे गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. परंतु, त्यांना काही दिवसांनी लागलीच हे गिफ्ट कस्टमने पकडले असून, त्याचा चार्ज भरल्यानंतर ते मिळतील असे सांगितले. त्यानुसार महिलेकडून ऑनलाइन पद्धतीने ६ लाख ३४ हजार ९९९ रुपये पाठवले.

    मात्र, कोणतेच गिफ्ट महिलेला मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक शबनम शेख करत आहेत.