अबब ! सात महिन्यांत साईचरणी ‘इतक्या’ कोटीचं दान; तर ४१ लाख भक्तांनी घेतले दर्शन

साई मंदिर उघडल्यानंतर पाच महिन्यांत ४१ लाख भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले असल्याची माहिती यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.

    शिर्डी : कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर शिर्डी साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झालं. त्यानंतर अवघ्या सात महिन्यांत साईंच्या झोळीत तब्बल १८८ कोटी ५५ लाख रुपयांचे विक्रमी दान जमा झाले. त्याचबरोबर मंदिर खुले झाल्यानंतर पाच महिन्यांतच ४१ लाख भाविकांनी शिर्डीला येऊन साईबाबा समाधीचे दर्शन घेतले असल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.

    भाविकांच्या संख्येत आणि दानात दररोज वाढ होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
    वर्षभरात करोडो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. अशा परिस्थितीत भाविक बाबांच्या दरबारात रुपये-पैसे, सोने-चांदी आणि इतर अनेक मौल्यवान वस्तूंचे दान करतात. कोरोना महामारीनंतर साईमंदिर सुरू झाल्यापासून गेल्या सात महिन्यांत साई भक्तांनी बाबांची झोळी भरगच्च भरून टाकली आहे. ऑक्टोबर २०२१ ते मे २०२२ या सात महिन्यांत एकूण १८८ कोटी ५५ लाख रुपये साईंच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

    साई मंदिर उघडल्यानंतर पाच महिन्यांत ४१ लाख भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले असल्याची माहिती यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.

    कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडात शिर्डीची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली होती. पहिल्या लॉकडाऊनमध्ये १७ मार्च २०२० मध्ये साई मंदिरचे कवाड भाविकांसाठी बंद झाले ते तब्बल आठ महिने म्हणजे १६ नोव्हेंबर २०२० रोजी उघडले. पुन्हा कोविड निर्बंध सुरू झाल्याने ५ एप्रिल २०२१ रोजी साई मंदिर पुन्हा बंद झाले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या परवानगीने ७ ओक्टोबर २०२१ रोजी भाविकांसाठी खुले करण्यात आले.