नवराष्ट्र इफेक्ट : झेडपीच्या “त्या’ शिक्षकांकडून वसुली सुरू ; पीआरसी कमिटीकडून दखल , बदल्यांची होणार चौकशी

संगणक परीक्षा पास न होता वाढीव भत्ता उचलणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांकडून रकमेची वसुली सुरू करण्यात आली आहे. "नवराष्ट्र' ने याबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची पीआरसी कमिटीने दखल घेतल्याचे अध्यक्ष संजय रायमुलकर यांनी सांगितले.

    सोलापूर : संगणक परीक्षा पास न होता वाढीव भत्ता उचलणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांकडून रकमेची वसुली सुरू करण्यात आली आहे. “नवराष्ट्र’ ने याबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची पीआरसी कमिटीने दखल घेतल्याचे अध्यक्ष संजय रायमुलकर यांनी सांगितले.
    जिल्हा परिषदेच्या शाळांवर काम करणाऱ्या शिक्षकांना संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर जादा भत्ता देण्यात येतो. पण बऱ्याच शिक्षकांनी संगणक परीक्षा उत्तीर्ण न होता हा भत्ता उचलल्याचे दिसून आले होते. याबाबत “नवराष्ट्र’ने वृत्त प्रसिद्ध केल्यावर या कमिटीने याची गंभीर दखल घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी संबंधित शिक्षकांकडून ही रक्कम वसूल करण्याचा आदेश दिला आहे. त्याप्रमाणे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी संबंधित शिक्षकांना रक्कम खात्यावर जमा करण्याची नोटीस बजावली असल्याचे अधीक्षक तजमुल मत्वली यांनी सांगितले तालुकानिहाय शिक्षकांची माहिती घेण्यात येत असून किती रक्कम वसूल झाली हे लवकरच दिसून येणार आहे.    सुमारे सहाशे शिक्षकांनी असा लाभ घेतला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे निधी वसुलीची रक्कम तब्बल एक कोटीवर जाणार असल्याचेही बोलले जात आहे. संगणक पदवी नसताना शिक्षकांना चा लाभ कोणी दिला याचीही चौकशी होणार आहे. तसेच संगणक पदवी नसतानाही भत्ता जमा होत असल्याबद्दल संबंधित शिक्षकांनी शिक्षण विभागाला कळविले आहे काय? याबाबत खातरजमा करण्यात येत आहे. संगणक पदवी बाबत लाभार्थ्यांची पडताळणी कोणी केली व अंतिम फाईल मंजूर कोणी केली याचीही चौकशी केली जाणार असल्याचे पीआरसी कमिटीच्या सदस्यांनी सांगितले.
    बदल्यांची चौकशी होणार… 
    विभागीय आयुक्त व उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये जिल्हा परिषद प्रशासनाने मध्यंतरी काही शिक्षकांच्या समायोजनातून नियुक्त्या दिल्या आहेत. याबाबत तक्रारी करण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त व उच्च न्यायालयाकडे किती शिक्षकांनी अपील केले होते व नियुक्त्या कोणाला दिल्या याची शिक्षण आयुक्तांकडे आता चौकशी होणार असल्याचे या कमिटीच्या सदस्यांनी सांगितले. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील या दोन्ही गंभीर प्रकरणाकडे “नवराष्ट्र’ ने लक्ष वेधले होते, हे येथे उल्लेखनीय!