‘लम्पी’साठी कंत्राटी पद्धतीने करणार पशुधन पर्यवेक्षकाची भरती

राज्य सरकारच्या आदेशानुसार विभागीय आयुक्त पशुधन पर्यवेक्षकांच्या कंत्राटी भरती प्रक्रियेचे अध्यक्ष असणार आहेत. कंत्राटी पद्धतीने पशुधन पर्यवेक्षक नेमण्यासाठी पुरवठादार नियुक्त केला जाणार असून यासाठी लवकरच ई टेंडर काढण्यात येणार आहे.

    मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क – राज्यात लम्पी रोगाने थैमान घातले आहे. राज्यातील पशुधन वाचविण्यासाठी राज्यसरकार कसोशीने प्रयत्न करत असले तरी लम्पीने जनावरे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे पशु संवर्धन विभागात कंत्राटी पद्धतीने ८७३ पशुधन पर्यवेक्षक नेमण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    राज्य सरकारच्या आदेशानुसार विभागीय आयुक्त पशुधन पर्यवेक्षकांच्या कंत्राटी भरती प्रक्रियेचे अध्यक्ष असणार आहेत. कंत्राटी पद्धतीने पशुधन पर्यवेक्षक नेमण्यासाठी पुरवठादार नियुक्त केला जाणार असून यासाठी लवकरच ई टेंडर काढण्यात येणार आहे.

    राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पशु चिकित्सा केंद्रांमधील अनेक पशुधन पर्यवेक्षकांची पदे रिक्त आहेत. मात्र, ज्या जिल्ह्यांमध्ये लम्पी रोगाने मृत्युमुखी पडणाऱ्या जनावरांचे प्रमाण जास्त आहे असा जिल्हयामध्ये रिक्त असणाऱ्या पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार आहेत. सरकारी स्तरावरून नियुक्त्या होणे कठीण असल्यामुळे कंत्राटी पद्धतीने हे पशुधन पर्यवेक्षक नेमण्यात येणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

    पशुधन पर्यवेक्षक पदाची कंत्राटी पद्धतीने भरती करताना ठेकेदाराकडून नियुक्त कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जाते. कंत्राटी पर्यवेक्षकांना १५ हजार रुपये वेतन देण्यात येणार असले तरी ठेकेदार प्रत्यक्षात त्यांच्या हातात केवळ ८ ते ९ हजार रुपये टेकवणार आहे. यात ठेकेदाराचा भरमसाठ फायदा होणार असून कंत्राटी कामगारांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या कंत्राटी पद्धतीला पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचारी, अधिकारी संघटनेने विरोध केला आहे. ज्या जागा रिक्त आहेत त्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती न करता सरकारने कायम स्वरूपी नोकर भरती करावी असे या संघटनेचे म्हणणे आहे.