खुलली टोमॅटोची लाली, वाढत्या तापमानाने टोमॅटो महागले तर कीड – रोगांमुळे उत्पादनात घट

तापमानात मोठी वाढ झाल्याने लावलेली लागवण सुकली. फुलगळती होण्यासह फळधारण अवस्थेत अडचणी आल्याने उत्पादनात घट आली. शिवाय मर, सूत्रकृमी या रोगांसह फळमाशी, लालकोळीचा प्रादुर्भाव झाल्याने एकूण लागवडीपैकी ७० टक्के क्षेत्रावर उत्पादनाला फटका बसला आहे.

    पथ्रोट : सध्या टोमॅटोच्या दराने उसळी घेतली असून दर दुप्पट झाले आहेत. त्यामुळे, सध्या टोमॅटोची लाली खुलल्याचे पाहायला मिळत आहे. टोमॅटोचे उत्पादन घटल्याने आवक अस्थिर आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक कमी झाल्याचे सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीत दिसून येत आहे.

    मार्च महिन्यासह एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमानात मोठी वाढ झाल्याने लावलेली लागवण सुकली. फुलगळती होण्यासह फळधारण अवस्थेत अडचणी आल्याने उत्पादनात घट आली. शिवाय मर, सूत्रकृमी या रोगांसह फळमाशी, लालकोळीचा प्रादुर्भाव झाल्याने एकूण लागवडीपैकी ७० टक्के क्षेत्रावर उत्पादनाला फटका बसला आहे.

    राज्यातील नाशिक भागातील लागवडीवर परिणाम होऊन उत्पादन घटल्याने आवकीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. अचलपुर, अंजनगाव, अकोट तालुक्यातील लागवडी कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आठ दिवसांत टोमॅटोच्या दरात तेजी येऊन ते दुप्पट झाले आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. गेल्या दीड महिन्यापासून दरात कायम सुधारणा दिसून आली. उन्हाळ्यात दर तिसऱ्या दिवशी एकरी प्रतितोड्याला सरासरी १२०० कॅरेट टोमॅटो निघतात. मात्र, सध्या ते निम्म्यावर आले असून, ५०० ते ६०० कॅरेट उत्पादन मिळत आहे. दरात सुधारणा दिसून येत असली तरी अनेक उत्पादनावर परिणाम झाल्याने काहीशी नाराजी आहे.

    कीड, रोग व तापमानवाढीमुळे परिणाम

    मालाची उपलब्धता मागणीच्या तुलनेत कमी असल्याने पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे उठाव मोठ्या प्रमाणावर आहे. स्थानिक बाजारासह महानगरासारख्या बाजारात माल कमी असल्याने दरात तेजी कायम असल्याचे ठोक भाजीव्यापारी म्हणत आहे. उष्णता वाढल्याने म्हणावे तशा लागवडी तयार झाल्या नाहीत. करपा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे, उत्तम नियोजन करून ४० टक्क्यांवर उत्पादन घटले. परिसरातील टोमॅटो उत्पादकांचे नुकसान झाले आहे. त्यात पाण्याची उपलब्धता कमी असल्याने पिकावर ताण पडला असल्याचे टोमॅटो लागवड करणारे शेतकरी सांगत आहे.