रिफायनरी विरोधकांचा राजापूर तहसिल कार्यालयावर मोर्चा, केंद्र शासनाच्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला दर्शवला विरोध

नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात त्यावेळी शिवसेना अग्रेसर असल्यामुळे रिफायनरी विरोधक शिवसेनेचा उदो उदो करताना दिसत होते मात्र आता धोपेश्वर बारसु परिसरात शिवसेनाच या प्रकल्पासाठी आग्रही असल्यामुळे आजच्या मोर्च्यात शिवसेना विरोधी घोषणा देण्यात येत होत्या.

    रत्नागिरी : कोकणची वाळवी …. राजन साळवी …उदय सामंत .. हाय हाय…एकच जिद्द..रिफायनरी रद्द,  अशा घोषणा देत आज रिफायनरी विरोधकांनी (Refinery Protestors) राजापूर तहसिल कार्यालयावर केंद्र शासनाच्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात (Refinery project) मोर्चा काढून आपला विरोध दर्शवला.

    केंद्र सरकारच्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला या अगोदर नाणार परिसरात विरोध करण्यात आला होता. त्यावेळी काही एन जी ओंच्या माध्यामातून येथील स्थानिकांच्या मनात या रिफायनरी प्रकल्पाबाबत मोठ्याप्रमाणावर गैरसमज पसरवण्यात आले होते. या विरोधामध्ये तत्कालीन सत्तेमध्येच असणाऱ्या शिवसेनेने उडी घेत रिफायनरी प्रकल्पाला विरोध करत युतीच्या शासनाला रिफायनरी प्रकल्पाची जमीन अधिग्रहणाची अधिसुचना रद्द करण्यास भाग पाडले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर युतीसाठी भाजपाने या प्रकल्पाचा बळी देत अधिसुचना रद्द केली होती. त्यानंतर रिफायनरी प्रकल्पाचा प्रश्न काही अंशी थांबला होता.

    मात्र दरम्यानच्या काळात नाणार परिसरातील स्थानिक प्रकल्प समर्थक शेतकऱ्यांनी सुमारे साडेआठ हजार एकर जमीन या रिफायनरी प्रकल्पासाठी देण्याची तयारी करत तशी संमतीपत्रे शासनाकडे सादर केली होती. तरीही विरोधात उतरलेल्या शिवसेनेने रिफायनरी विरोधाचा हेका कायम ठेवत नाणार जाणार म्हणजे जाणार अशी घोषणा दिली होती. त्यानंतर या प्रकल्पाचे भवितव्य अंधारमय झाले होते. दरम्यानच्या काळात शिवसेनेने धोपेश्वर बारसु परिसरात मिनी औद्योगिक वसाहतीसाठी अधिसुचना जाहीर केली होती व त्यानंतर या परिसरात रिफायनरी प्रकल्प हलवण्याची तयारी सुरु केली. या धोपेश्वर बारसु परिसरातील जनतेने या प्रकल्पाला पाठिंबा देत समर्थन केले व तशी मागणी शासनाकडे एकमुखाने केली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यानी या ठिकाणी रिफायनरी होण्याचे संकेत दिले. गेले दोन दिवस कोकण दौऱ्यावर असणारे आदित्य ठाकरे यानी मंगळवारी पुन्हा राजापूर येथे या प्रकल्पाचे सुतोवाच केले.

    आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर असतानाच आज पुन्हा या रिफायनरी प्रकल्प विरोधाने डोके वर काढले आहे. नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात त्यावेळी शिवसेना अग्रेसर असल्यामुळे रिफायनरी विरोधक शिवसेनेचा उदो उदो करताना दिसत होते मात्र आता धोपेश्वर बारसु परिसरात शिवसेनाच या प्रकल्पासाठी आग्रही असल्यामुळे आजच्या मोर्च्यात शिवसेना विरोधी घोषणा देण्यात येत होत्या.