ऊस वाहतुकीला आता ‘रिफ्लेक्टर’ बंधनकारक, नियम न पाळल्यास…; साखर आयुक्तांचा इशारा

ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर-ट्रेलर, बैलगाड्यांना वाहनांची धडक बसून होणारे अपघात टाळण्यासाठी ‘रिफ्लेक्टर बोर्ड’ व टेप लावण्याच्या सूचना साखर आयुक्तालयाने सहकारी व खासगी साखर कारखान्यांना दिल्या आहेत.

    पुणे : ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर-ट्रेलर, बैलगाड्यांना वाहनांची धडक बसून होणारे अपघात टाळण्यासाठी ‘रिफ्लेक्टर बोर्ड’ व टेप लावण्याच्या सूचना साखर आयुक्तालयाने सहकारी व खासगी साखर कारखान्यांना दिल्या आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक नियम पालनाची जबाबदारी चालक- मालकांसह मालवाहतूक करणाऱ्या साखर कारखान्यांचीही आहे.

    यंदाच्या ऊस गाळप हंगामात ऊस वाहतूक करताना अपघात होऊ नये, यासाठी वाहतूकदार चालक-मालकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. साखर कारखान्यांवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रेलर, बैलगाड्या व ट्रक या वाहनांना रिफ्लेक्टर बोर्ड व टेप बसविणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यास वाहनचालक- मालकाला दंड होणार आहे.

    राज्यात ऊस गाळप हंगामाला एक नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर टेप नसणे, एकापेक्षा जास्त ट्रेलर जोडून उसाची वाहतूक करणे, आरसे न लावणे, मोठ्या आवाजात वाहनांत ‘म्युझिक सिस्टीम’ लावणे, चुकीच्या पद्धतीने ‘ओव्हरटेक’ करणे, वाहने रस्त्याच्या कडेला उभी करणे, वाहनाबाहेर येईल अशा पद्धतीने ऊस भरणे, शेतातून मुख्य रस्त्यावर इतर वाहनांचा अंदाज न घेता ट्रॅक्टर, ट्रेलर आणणे आदी कारणांमुळे अपघात होऊ शकतात.

    ऊस वाहतूक करणारी वाहने रात्रीच्या वेळेत प्रवास करतात. काही वेळा वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. मात्र, वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. त्या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी परिपत्रक काढून सुरक्षित ऊस वाहतुकीसाठी साखर कारखान्यांना सूचना दिल्या आहेत.