शवविच्छेदन करण्यास नकार; उरुळी कांचन येथील वैद्यकीय अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

शवविच्छेदन करण्यास नकार देणाऱ्या उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या आदेशाने उरुळी कांचनला तातडीने दोन एमबीबीएस डॉक्टरांची नेमणूक केली आहे..

    उरुळी कांचन : शवविच्छेदन करण्यास नकार देणाऱ्या उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या आदेशाने उरुळी कांचनला तातडीने दोन एमबीबीएस डॉक्टरांची नेमणूक केली आहे..

    ताम्हणवाडी (ता. दौंड) येथील एका तरुणाचा बुधवारी अपघातात मृत्यू झाला होता. त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह उरुळी कांचन येथे आणला असता, या ठिकाणी कामावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली लोखंडे यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन व माजी सदस्य संतोष कांचन यांनी त्यांना विनवणी करूनही त्यांनी ऐकले नाही. तसेच माझी शवविच्छेदन करण्याची मानसिकता नाही हे कारण देत नकार घंटा चालूच ठेवली. यानंतर ग्रामस्थांनी वरिष्ठांकडे तक्रार करून प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावण्याचा इशारा देत वरिष्ठांचे लक्ष वेधले.

    दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत उरुळी कांचन मार्गे पुण्याकडे जात असल्याची माहिती मिळाली आणि या विषयाला वेगळे वळण मिळाले. अलंकार कांचन, संतोष कांचन, किशोर मेमाणे, अभिषेक पवार आदींनी आरोग्य मंत्री सावंत यांची रस्त्यातच मेमाणे फार्म येथे भेट घेत त्यांच्यासमोर या घटनेची वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर सावंत यांनी त्वरित पुण्यातील आरोग्य खात्याच्या वरिष्ठांना फोनवरच या काम टाळणाऱ्या महिला आरोग्य अधिकारी रुपाली लोखंडे यांची बदली करण्याचे आदेश दिले.

    दोन एमबीबीएस डॉक्टरांची नेमणूक

    तसेच उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राला तातडीने दोन एमबीबीएस डॉक्टर देण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉ. राजेश पाखरे आणि डॉ. मेहबूब लुकडे यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश चव्हाण यांनी तातडीने काढले. या तडकाफडकी बदलीमुळे उरुळी कांचन परिसरामध्ये ग्रामस्थ, ग्रामपंचायत व पोलिस खात्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र नवीन अधिकारी कामाचे कसे नियोजन व जनतेला सहकार्य करतात हे पाहणे गरजेचे आहे.