केतकी चितळेवर गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, देहूरोड पोलिसांकडे तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयीच्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकीवर गुन्हा दाखल कारण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

    देहूरोड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयीच्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकीवर गुन्हा दाखल कारण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

    याबाबत राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने देहूरोडच्या पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिषेक म्हस्के, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आशिष बन्सल, अल्पसंख्याक शहराध्यक्ष जाफर शेख यांच्यासह किशोर गाथाडे, गौरव सूर्यवंशी, धनराज शिंदे, मुकेश फाले, तेजस कुंभार, सुरेश येवले, रेणू रेड्डी, जयसिंग भोसले, अजित नाईक, एस. डी. कालदन्ते आदी उपस्थित होते.

    केतकी चितळे तिच्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. यावेळी केतकीने पुन्हा सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. या पोस्टवरुन केतकीवर जोरदार टीका होत असून सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जात आहे. याप्रकरणी केतकीविरोधात कळवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

    केतकी चितळेने आपल्या अधिकृत फेसबूक अकाऊंटवरील पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिले आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचेही तिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे. शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त फेसबूक पोस्टमुळे केतकी वादात सापडली आहे. नेटिझन्स केतकीला काही तारतम्य आहे का ? असाही सवाल करत आहेत. तर काही नेटिझन्सनी केतकीला खडेबोल सुनावत संताप व्यक्त करीत आहेत.