नुपूर शर्मा, नवीन जिंदाल यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला भरा : कॉ. नरसय्या आडम

एका धर्माच्या भावनांना आघात पोहोचेल, असे वक्तव्य केंद्रातील सत्ताधारी असणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्यांनी जाहीरपणे केले आहे. त्याचे गंभीर पडसाद देशात व जगात उमटलेले दिसून येत आहेत.

    सोलापूर : एका धर्माच्या भावनांना आघात पोहोचेल, असे वक्तव्य केंद्रातील सत्ताधारी असणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्यांनी जाहीरपणे केले आहे. त्याचे गंभीर पडसाद देशात व जगात उमटलेले दिसून येत आहेत. भारतीय संस्कृती आणि संविधानानुसार कुठल्याही धर्म विशेष अथवा राजकीय पक्षाच्या व्यक्तींना दुसऱ्या धर्माच्या भावना व श्रद्धांवर आघात करण्याचा अधिकार नसून सर्वांना आपापल्या धर्मानुसार राहण्याचा, वागण्याचा व त्याचे अनुसरण करण्याचा अधिकार आहे, असे माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (Narsayya Adam) यांनी सांगितले.

    ते पुढे म्हणाले, जगातील कित्येक देशांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधावर परिणाम होत असून, या गोष्टी देशाच्या हिताच्या दृष्टीने अयोग्य आहे. म्हणून केंद्रातील सत्ताधारी भाजपचे प्रतोद असणाऱ्या नुपूर शर्मा व नवीनकुमार जिंदाल यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबद्दल अनुउद्गार काढून जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेला नख लावल्याबद्दल कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. त्यांना तातडीने अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात केली पाहिजे. या व अशा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. यांच्यावर यूएपीए कायद्याअंतर्गत राष्ट्रद्रोहाचा खटला भरा, अशी मागणी राष्ट्रपतींकडे केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

    यावेळी सर्व नेते व कार्यकर्ते काळ्या रंगाचे कपडे परिधान करून काळ्या रंगाच्या फिती लावून, काळे झेंडे दाखवून केंद्र सरकार आणि भाजपचा जोरदार घोषणा देऊन निषेध करण्यात आला. या आंदोलनात पोलिसांनी दडपशाही करून ध्वनीक्षेपक लावण्यास मज्जाव केला.