election voters list

मयत व दुबार अशी एकूण १३ हजार ८०० मतदारांची नावे कमी : प्रांताधिकारी सुनील गाडेंची माहिती

    पाटण : तालुका दुर्गम व डोंगराळ असूनही पाटण विधानसभा मतदारसंघात मतदार यादी शुध्दीकरणाचे काम चांगले झाले आहे. आजपर्यंत १८ ते १९ वयोगटातील मतदारांची नाव नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली असून काही दुबार व मयत नावेही मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली आहेत. अजूनही राहिलेल्या नवमतदार व विवाहित महिलांनी आपली नावे मतदार यादीत नोंद करावीत. मतदार याद्या दि. २३ जानेवारीपासून स्थानिक बीएलओ यांच्यामार्फत प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. याबाबत काही हरकती असल्यास संबंधित अधिकारी अथवा बीएलओंकडे सादर कराव्यात, असे आवाहन प्रांताधिकारी सुनील गाडे यांनी पत्रकार परिषदेत केले. येथील तहसीलदार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार ए. ए. मुलाणी उपस्थित होते.

    प्रांताधिकारी गाडे म्हणाले, पाटण विधानसभा मतदारसंघात नवीन मतदान नोंदणीचे सर्वाधिक काम झाले असून यामध्ये १८ ते १९ वयोगटातील ५ हजार ८६२ मतदारांसह एकूण १२ हजार ६६१ इतक्या नवीन मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली आहे तर मयत व दुबार असे एकूण १३ हजार ८०० मतदारांची नावे कमी करण्यात आली आहेत. तालुक्यात १ लाख ५१ हजार ६१४ पुरुष मतदार व १ लाख ४७ हजार ९६ स्त्री असे एकूण २ लाख ९८ हजार ७१० मतदार आहेत. हजारी पुरुषामागे ९२९ इतकी महिलांची संख्या आहे. मात्र अद्यापही ३ हजारच्या आसपास नवीन मतदार अजूनही नोंदणीसाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. याबाबत अंगणवाडी सेविका, महसूल कर्मचाऱ्यांमार्फत जनजागृती सुरू आहे. तालुक्यातील अनेक विद्यार्थी शिक्षणानिमित परगावी असल्याने त्यांची नावे अजून मतदार यादीत नोंदविण्यात आली नसल्याचे आढळून आले आहे. याशिवाय नवीन लग्न झालेल्या विवाहित मुलींची नावे देखील अजून पाहिजे त्या प्रमाणात नोंदविलेली नाहीत. अशा नवविवाहित मुलींनी आपली नावे सासरच्या ठिकाणी नोंदवावीत. त्याचबरोबर तालुक्यातील बाहेर असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची नावे आजपर्यंत स्थानिक गावातील मतदार यादीत तशीच होती. याबाबत आपण तहसीलदार रमेश पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांसोबत त्या-त्या गावात जावून त्यांच्या सहमतीने ती नावे कमी केली आहेत. ही कामे करत असताना तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी यांच्या बैठका घेवून मयत व स्थलांतरित झालेल्या विवाहित मुलींची नावे कमी करताना सर्वांनी विश्वासात घेवून कामे केली आहेत.

    पाटण तालुका हा दुर्गम व डोंगराळ असतानाही अंगणवाडी सेविका, तलाठी, मंडलाधिकारी, महसूल कर्मचारी, निवडणूक शाखेतील कर्मचारी यांनी चांगले काम केले आहे. तालुक्यात मतदार यादी शुध्दीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. आगामी काळात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. २३ रोजी मतदार याद्या प्रसिध्द करण्यात येत असून या यादीवर काही आक्षेप असतील तर त्याबाबत संबंधित बीएलओ यांच्याकडे त्या सादर कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.