Pune Koyta Gang

  पुणे : गेल्या काही महिन्यांपासून पुणे पोलीस अन् कोयत्याचे नात जरा खूपच नाजूक अन् भीतीदायक असल्याचे चित्र आहे. कोयता गुन्हेगारांच्या हातात असल्याने तो पुणेकरांनाही भीती दाखवत आहे. त्यामुळे कोयता दिसताच पुणेकरांपेक्षा पुणे पोलिसांनाच जास्त भीती वाटते.

  एरंडवणे भागातील महापालिकेचे सफाई कामगार

  अशा वातावरणात पोलीस आयुक्तालयातील नियत्रंण कक्षात बसलेल्या कर्मचाऱ्यांना सीसीटीव्हीत दोन तरुण दुचाकीवरून हातात कोयते घेऊन जात असताना दिसले अन् लागलीच त्यांनी दक्ष होत संबंधित परिसर पाहिला  असता तो एरंडवणा भाग असल्याचे दिसून आले. अलंकार पोलिसांना याची माहिती देऊन तपास पथकाला रवाना केले. अलंकार पोलिसांनीही धावपळ करीत काही वेळात त्या दोन तरुणांना पकडले. चौकशी केली अन् सुटकेचा श्वास सोडला. कारण, दोघे एरंडवणे भागातील महापालिकेचे सफाई कामगार असल्याचे समोर आले. ते झाडे कापण्यासाठी कोयता घेऊन निघाले होते.

  पुणेकरांसोबतच पुणे पोलिसांच्यादेखील नाकीनऊ

  पुण्यातील कोयता गँग व कोयते धाऱ्यांनी पुणेकरांसोबतच पुणे पोलिसांच्यादेखील नाकीनऊ आणले आहे. अधिवेशनातदेखील याचे पडसाद उमटले होते. तेव्हापासून कोयता म्हंटले की, पोलीस अलर्ट मोडवर असतात. तरीही अधून-मधून कोयते घेऊन वाहनांची तोडफोड होते. त्यामुळे पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.
  कोथरूड भागातील डहाणूकर कॉलनी परिरसरात रामदासजी कळसकर पथ नामफलकासमोर एक लहान झाड वाढल्याने नाव झाकले गेले होते. तेथे वाढलेली झाडी, झुडपे कापून सफाई करावी, अशी तक्रार नागरिकांनी कोथरुड-बावधन क्षेत्रीय कार्यालयात नोंदविली होती.

  कोयताधारक तरुणांना पकडण्याचे आदेश नियंत्रण कक्षातून आदेश

  क्षेत्रीय कार्यालयातील दोन सफाई कामगारांनी आरोग्य कोठीतून कोयते घेतले. दुचाकीने ते डहाणूकर कॉलनीकडे निघाले. सफाई कामगारांनी कोयत्याने झाड तोडले. तेथून ते पुन्हा क्षेत्रीय कार्यालायाकडे निघाले होते. पाठिमागे बसलेल्या कामगाराने कोयता हातात धरला होता. मात्र, पोलीस आयुक्तालयातील नियत्रंण कक्षात बसलेल्या एका कर्मचाऱ्याला सीसीटीव्हीत दोघेजन दुचाकीने हातात कोयता घेऊन जाताना दिसले. लागलीच त्याने अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेश तटकरे यांना हे फोटो व सीसीटीव्ही पाठविले आणि कोयता बाळगणाऱ्यांना पकडा असे सांगितले.

  सफाई कामगार असल्याचे सांगितले

  गुन्हे पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, आशिष राठोड, पोलीस कर्मचारी निशिकांत सावंत यांनी तपास सुरू केला. भारतीय जनता पक्षाच्या झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब दांडेकर व मुकादम वैजीनाथ गायकवाड यांना बोलवत हे फोटो व सीसीटीव्ही दाखविले. त्यांनी व्हिडीओ पाहिला असता दुचाकीवरून कोयता घेऊन जाणारे कोयता गँगमधील गुन्हेगार नाही तर ते सफाई कामगार असल्याचे सांगितले. त्यानंतर सफाई कामगारांना अलंकार पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले. सफाई कामगार घाबरले होते.

  कोयते, कुऱ्हाडींचा वापर गवत व फांद्या कापण्यासाठी

  कोयते, कुऱ्हाडींचा वापर गवत व फांद्या कापण्यासाठी केला जातो. उघड्यावर कोयते आणि कुऱ्हाडी घेऊन फिरू नका. महापालिकेने कोयते आणि कुऱ्हाडींची नोंद ठेवावी. कोयते, कुऱ्हाडी झाकून नेल्यास नागरिकही भीतीपोटी तक्रार देणार नाहीत, असे पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांनी सांगितले. कामाची नोंद, तसेच छायाचित्रे काढून ठेवावीत, असे त्यांनी सांगितले.