Dr. Vinayak Kale appointed as new dean of Sassoon Hospital
Dr. Vinayak Kale appointed as new dean of Sassoon Hospital

  पुणे : अमली पदार्थ तस्करीतील मुख्य सूत्रधार ललित पाटील प्रकरणात ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना केवळ पदमुक्त करणे म्हणजे सरकारची नौटंकी आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी शनिवारी येथे केला. डॉ. ठाकूर यांना या प्रकरणात सहआरोपी करून त्यांना तत्काळ अटक झाली पाहिजे. त्यांची नार्को चाचणी व्हायला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
  ललित पाटील याच्यावर ससून रुग्णालयात उपचार
  ड्रग्ज माफीया ललित पाटील याच्यावर ससून रुग्णालयात सुरू असलेल्या उपचार प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर आला असून, या चौकशी समितीच्या अहवालात अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आणि डॉ. प्रविण देवकाते हे दोषी आढळले आहेत. या दोघांवरही कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार डॉ. ठाकूर यांना केवळ पदमुक्त करण्यात आले. तर देवकाते यांचे निलंबन करण्यात आले.
  सरकार डॉ. ठाकूर यांची पाठराखण करतेय
  या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार श्री. रवींद्र धंगेकर बोलत होते. ते म्हणाले, डॉ. ठाकूर यांच्या विरोधात उच्च न्यायालयाने निकाल दिला होता. त्यामुळे त्यांना अधिष्ठाता पद सोडावे लागणारच होते. तीच कारवाई ठाकूर यांच्यावर ललित पाटील प्रकरणातही केल्याने सर्वसामान्यांच्या मनात आश्चर्याची भावना आहे. सरकार डॉ. ठाकूर यांची पाठराखण करीत आहे. हे यातून स्पष्ट झाले आहे.
  त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे
  डॉ. ठाकूर हे चौकशी समितीच्या अहवालानुसार दोषी आढळले आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. सरकारने या प्रकरणात वेळकाढूपणा करता कामा नये. त्यांना थेट अटक झाली नाही तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने रस्त्यावर उतरू. अनेक पालकांनीसुद्धा माझ्याकडे हीच भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे असंख्य पालकसुद्धा न्यायासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असेही ते म्हणाले.