दूध संघ निवडणूक मंगेश चव्हाणासह अन्य दोन जणांना दिलासा; रहिवासी नसलेल्या तालुक्यातून निवडणूक लढविण्यास मंदाकिनी खडसेंचा आक्षेप न्यायालयाने फेटाळला

जिल्हा दूध संघ सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार उमेदवारी नामांकन अर्ज प्रकिया पार पडली आहे. दरम्यान मुक्ताईनगर मतदार संघातून मंगेश चव्हाण, एरंडोल मधून सुभाष नानाभाऊ पाटील आणि रमेश जगन्नाथ पाटील धरणगाव या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.

  • सहकार जिल्हा उपनिबंधकांचा १४ नोव्हेंबरचा निर्णय कायम

जळगाव- जिल्हा दूध संघ निवडणुकीत (Jalgaon District Dudh Sangh Election) आ. मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांनी मुक्ताईनगर (Muktainagar) येथून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या आ.चव्हाण यांच्या अर्जास तक्रारदार मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांनी आव्हान देत जिल्हा उपनिबंधक सहकार तसेच औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.

या अर्जावर जिल्हा उपनिबंधकांनी (District Deputy Registrar) सुनावणी घेत राखीव जागा वगळता कोणताही उमेदवार कोणत्याही तालुक्यातून निवडणुकीसाठी अर्ज दाखल करू शकतो असा निर्णय दिला होता. हा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने देखील बुधवारी झालेल्या सुनावणीअंती कायम केला असल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी म्हटले आहे.

जिल्हा दूध संघ सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार उमेदवारी नामांकन अर्ज प्रकिया पार पडली आहे. दरम्यान मुक्ताईनगर मतदार संघातून मंगेश चव्हाण, एरंडोल मधून सुभाष नानाभाऊ पाटील आणि रमेश जगन्नाथ पाटील धरणगाव या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या उमेदवारी अर्जांना मुक्ताईनगर येथील मंदाकिनी खडसे तसेच खेमचंद रामकृष्ण महाजन यांनी जिल्हा उपनिबंधक सहकार विभाग यांच्याकडे हरकत नोंदवत औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.

जिल्हा दूध संघ निवडणूकीसाठी एका तालुक्यातील उमेदवार रहिवासी नसलेल्या तालुक्यातून अर्ज दाखल करू शकत नाही या मुद्याचे खंडन करीत, सहकारी संस्था पोटनियमानुसार मतदार यादी जिल्हा तालुका मतदार संघाची एकच आहे. तसेच राखीव मतदार संघ असेल अशा ठिकाणी हा नियम लागू आहे. त्यामुळे अंतीम मतदार यादीत नाव असलेला उमेदवार जिल्ह्यातून कोठेही प्रतिनिधीत्व करू शकेल.

उमेदवार सूचक अनुमोदक यांना कोणतेही बंधन नसल्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी तक्रारदार व जबाब देणार यांचे म्हणणे ऐकून सादर केलेल्या उत्तरानुसार दिला होता. तसेच बुधवारी देखिल हरकतदारांच्या वतीने ऍड.विक्रम पवार तर जबाब देणार्‍यांच्या वतीने ॲड. धनंजय ठोके यांनी लेखी व तोेंडी जबाब सादर केले. त्यानुसार मंदाकिनी खडसे आणि खेमचंद रामकृष महाजन यांचा हरकत अर्ज फेटाळण्यात आला. तर उमेदवार मंगेश चव्हाण सुभाष पाटील आणि रमेश पाटील यांना दिलासा मिळाला आहे.

अखेर…… सर्वपक्षीय आघाडी नाहीच

मविआ विरूद्ध भाजपा-शिंदे गटाऐवजी राष्ट्रवादी(खडसे)विरूद्ध भाजपा अशीच लढत, माघारीनंतर होणार चित्र स्पष्ट

जिल्हा दूध संघाची सार्वत्रिक निवडणूक जाहिर होवून १५ दिवस झालेत, तर निवडणूक मतदानास २४ दिवस शिल्लक आहेत. दरम्यान दूध संघाच्या निवडणूकीसाठी मुदतीअखेर ३६० इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज नेण्यात आले. त्यानुसार १७९ नामांकन अर्ज दाखल असून छाननी अंती ११४ उमेदवारी अर्ज वैध घोषीत करण्यात आले. त्यातही रावेर तालुक्यातून श्रावण सदा ब्रम्हे यांचा एकमेव अर्ज असल्याने पहिला उमेदवार बिनविरोध तर एरंंडोल तालुक्यातून सुभाष पाटील यांची माघार झाली आहे. माघारीसाठी अजून १२/१३ दिवस असले तरी या मुदतीत किती जणांची माघार होते यानंतरच किती उमेदवारांमध्ये लढत आहे, हे स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, जिल्हा दूध संघासाठी सर्वपक्षीय आघाडी करावी असे मविआ विशेषतः राष्ट्रवादीच्या गटातर्फे डॉ.सतीश पाटील यांंनी आवाहन केले. परंतु दूध संघाची निवडणूक सर्वपक्षीय पॅनलव्दारे बिनविरोध होणे शक्य नसल्याचेच दिसून येत आहे. जिल्हा दूध संघाची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आणि जाहीर झाल्यानंतर आतापर्यंतची वाटचाल पाहिली तर, जिल्हा बँकेप्रमाणे दूध संघाच्या निवडणूकीत मविआ विरूद्ध भाजपा ऐवजी मविआ विशेषतः राष्ट्रवादी-खडसे गट विरूद्ध भाजपा-शिंदे गट असे चित्र स्पष्ट आहे.

जिल्हा दूध संघावर प्रशासक नेमण्यात आले. परंतु माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी न्यायालयाच्या निर्णयानुसार परिस्थिती जैसे थे चे आदेश मिळवित पुन्हा संचालक मंडळाकडे कारभार हाती घेण्यास यश मिळविले. दरम्यान, दूध संघात दूग्ध व दूग्धजन्य पदार्थांच्या खरेदीत अफरातफर, अपहार यासंदर्भात तत्कालीन प्रशासक आ.मंगेश चव्हाण यांनी शहर पोलीस ठाण्यात संचालक अध्यक्षांविरूद्ध तक्रार दाखल केली होती तर दूध संघात दूग्धजन्य पदार्थांची चोरी झाल्याचा एकनाथराव खडसे यांनी आरोप करीत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी ठाण मांडले होते. त्यानंतर गेल्या ३० ऑक्टोबर रोजी दूध संघाची निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

दरम्यान, जिल्हा दूध संघावर तसेच लोण्यावर मंत्र्यांसह आमदारांचा डोळा असल्याचा तसेच निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करतांना मतदार संघ व उमेदवारी नियमांची मोडतोड करण्यात आली असल्याचा आरोप एकनाथराव खडसे यांनी करीत औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. परंतु जिल्हा तसेच तालुक्याची मतदार यादी एकच असून राखीव मतदार संघ वगळता अन्य कोणत्याही मतदार संघातून कोठेही उमेदवारी करता येउ शकत असल्याचा निर्णय खंडपीठाने दिला आहे. एकूणच जिल्हा बँकेची निवडणूकीत एकहाती सत्ता मिळवलेल्या खडसे मविआ गटाला यावेळी जिल्हा दूध संघांसाठी आव्हानच असल्याचे दिसून येत आहे.