आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणी सोमय्या पिता – पुत्रांना अटकेपासून दिलासा

पाकिस्तानविरुद्धच्या युद्धामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आयएनएस विक्रांत (INS Vikrant) ही युद्धनौका भंगारात काढण्याऐवजी डागडुजी करण्यासाठी खासदार किरीट सोमय्यांसह (Kirit Somaiya) त्यांचा पुत्र नील सोमय्याने पुढाकार घेऊन मुंबईत ठिकठिकाणी मदतनिधी उभारण्याचा घाट घातला.

    मुंबई: आयएनएस विक्रांत युद्धनौकेसाठी (INS Vikrant Scam Case) जमवलेल्या कोंटीच्या निधीचा अपहारप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि मुलगा नील सोमय्यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) बुधवारी कायमस्वरुपी दिलासा देत याचिका निकाली काढली. तपासासाठी सहकार्य करण्याची सूचना सोमय्यांना देण्यात आली. तसेच पोलिसांना अटकेआधी ७२ तास नोटीस देणे अनिवार्य असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

    पाकिस्तानविरुद्धच्या युद्धामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आयएनएस विक्रांत ही युद्धनौका भंगारात काढण्याऐवजी डागडुजी करण्यासाठी खासदार किरीट सोमय्यांसह त्यांचा पुत्र नील सोमय्याने पुढाकार घेऊन मुंबईत ठिकठिकाणी मदतनिधी उभारण्याचा घाट घातला. त्यातून सुमारे ५७ कोटींचा निधी जमा केला. या निधीचा सोमय्या पिता-पुत्रांनी अपहार केल्याचा आरोप करून माजी सैनिक बबन भोसले यांनी ७ एप्रिलला तक्रार नोंदवल्यानंतर ट्रॉम्बे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी सोमय्या पिता-पुत्रांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

    सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळून लावल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. त्यावर न्या. भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा याप्रकरणी अद्याप तपास सुरू असून सोमय्या पितापुत्रांची चौकशीही सुरू असल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली. तसेच येत्या १७ ऑगस्टला किरीट सोमय्या तर १८ ऑगस्टला नील सोमय्या यांना चौकशीसाठी समन्स जारी केल्याची माहितीही न्यायालयाला दिली. त्याची नोंद घेत अटकेची गरज भासल्यास सोमय्या पितापुत्रांना ७२ तास आधी रितसर नोटीस पाठवण्याचे पोलिसांना निर्देश देत याचिका निकाली काढली.