नाना पटोले फोन टॅपिंग प्रकरणात मोठी अपडेट – रश्मी शुक्लांना दिलासा कायम

बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याप्रकरणी (Phone Tapping Case) रश्मी शुक्लांविरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तो गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत वरिष्ठ रश्मी शुक्ला (Rahmi Shukla) यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकील समीर नांगरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.

    मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा (Nana Patole Phone Tapping Case) फोन बेकायदेशीररित्या टॅप केल्याप्रकरणी पुण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा (Crime) रद्द करण्याची मागणी करत वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात  (Mumbai High Court) याचिका दाखल केली आहे. त्यावर बुधवारी न्यायालयाने रश्मी शुक्ला यांना दिलासा (Relief To Rashmi Shukla) देत दिलेले संरक्षण कायम ठेवले.

    अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अमजद खानच नाव सांगून २०१६-१७ या कालावधीत आपला फोन टॅप करण्यात आला असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे स्वीय सहाय्यक, तत्कालीन भाजप खासदार संजय काकडे आणि इतर निवडून आलेल्या अन्य काही लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करण्यात आल्याचेही पटोले यांनी म्हटले होते. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाल्यानंतर बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याप्रकरणी रश्मी शुक्लांविरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तो गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकील समीर नांगरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.

    आपल्याविरोधातील गुन्हा हा राजकीय सूडबुद्धीने दाखल करण्यात आला असून चुकीच्या पद्धतीने आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा शुल्कांनी याचिकेतून केला आहे. या याचिकेवर बुधवारी न्या.नितीन जामदार आणि न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, न्यायालयाने शुक्ला यांना कारवाईपासून दिलेला दिलासा ६ जुलैपर्यंत कायम ठेवत सुनावणी तहकूब केली.

    रश्मी शुक्ला या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. सध्या त्या हैदराबादमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर कार्यरत आहेत.