पश्चिमला दिलासा, मध्यचं नेहमीचच रडगाणं, हार्बरला मध्येच लटकवलं; रेल्वेने आज असा डिसाईड केलाय Mega Block

  मध्य रेल्वेच्या उपनगरीय भागांत दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी मेगाब्लॉक (Megablock Updates) असणार आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर हा मेगा ब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती जनसंपर्क विभागाकडून परिपत्रक जारी करत देण्यात आली. आज रविवारी घेतला जाणारा मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनानं दिलगीरी व्यक्त केली आहे.

  हार्बर मार्गावर मेगाब्लॉक :


  कुर्ला आणि वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११:१० ते सायंकाळी ४:१० पर्यंत तर पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सकाळी १०:३४ ते दुपारी ३:३६ पर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सकाळी १०:१६ ते दुपारी ३:४७ वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी विभागांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

  हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांवरून प्रवास करण्याची मुभा आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला आणि पनवेल- वाशी या भागांत विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे- वाशी/नेरूळ स्थानकावरून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असणार आहे.

  मध्य रेल्वे मेगाब्लॉक :

  मध्य रेल्वेवर रविवार ३० ऑक्टोबर रोजी देखभालीचे काम करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ पर्यंत, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०: २५ ते दुपारी ३:३५ पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबतील.

  ठाण्याच्या पलीकडे या जलद गाड्या पुनश्च डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटं उशिरानं गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाणे येथून सकाळी १०:५० ते दुपारी ३:४६ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबवल्या जातील. त्यापुढे या अप जलद सेवा अप जलद मार्गावर वळविल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने निश्चित स्थानावर पोहोचतील.

  पश्चिमला दिलासा :

  मध्य आणि हार्बर तुलनेत पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसभराचा ब्लॉक असणार नाही. पश्चिम रेल्वेवर शनिवार, रविवार मध्यरात्री गोरेगाव आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान रात्रीचा ब्लॉक घेण्यात आला आहे.