इतिहासकालीन नाण्यानंतर तामजाईनगरमध्ये आढळले प्राचीन खापरी भांड्यांचे अवशेष

मातीमध्ये काही प्राचीन खापराच्या भांड्याचे (Khapri Pots) अवशेष आढळून आले. खापरी तुकड्यांचे अवशेष त्याचे बाजारमूल्य नगण्य असले तरी इतिहास अभ्यासकांच्या दृष्टीने ते मौल्यवान आहेत.

    सातारा : तामजाईनगर येथे नुकतीच काही इतिहासकालीन नाणी सापडली आहेत. ही नाणी ज्या ठिकाणी सापडली या मातीत आणखीन काही नाणी असण्याची शक्यता गृहीत धरून पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे (Tejas Garge) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रविण शिंदे, अभिरक्षक श्री छत्रपती शिवाजी संग्रहालय सातारा व जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था यांच्या माध्यमातून या ठिकाणी शोध मोहीम हाती घेण्यात आली. मातीमध्ये काही प्राचीन खापराच्या भांड्याचे (Khapri Pots) अवशेष आढळून आले.

    खापरी तुकड्यांचे अवशेष त्याचे बाजारमूल्य नगण्य असले तरी इतिहास अभ्यासकांच्या दृष्टीने ते मौल्यवान आहेत. या खापरी अवशेषांमध्ये खापरी भांड्यांच्या तोट्या, मडक्यांचे काठ, खापराच्या ताटांचे तुकडे, भाजक्या माती चा मणी अशा गोष्टींचा समावेश आहे.

    प्रथमदर्शनी त्याचा कालखंड इसवी सन चौदाव्या शतकाच्या ही आधीचा असावा असा अंदाज आहे. सातारा शहराची स्थापना सुमारे तीनशे वर्षांच्या आसपास अशी मानली जाते. त्यामुळे सातारा शहरात प्राचीन वसाहतीचा शोध अजून तरी लागलेला नाही; परंतु, किल्ले साताराच्या घेऱ्यातील काही गावे ही सातारा शहरापेक्षा अधिक जुनी आहेत. साताऱ्यातील करंजे हा भाग त्यापैकीच एक आहे.

    आज आढळून आलेल्या प्राचीन अवशेष आवरून या गोष्टीला अधिक पुष्टी मिळते. सातारा शहरानजीक असे अवशेष सापडल्याची ही पहिलीच घटना असल्याने सातारच्या इतिहासाचे एक नवे दालन खुले होत आहे. यामागे सापडलेली नाणी ही जरी इतिहासकालीन असली तरी त्याच्या बरोबरीने सापडलेले अवशेष थोडे अधिक प्राचीन आहेत. त्यामुळे हे सर्व ज्या मातीत सापडत आहेत त्या वास्तूचा शोध घेणे व प्रामुख्याने त्या वास्तूसाठी वापरलेल्या मातीचा मूळ स्त्रोत याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कदाचित सातारानजीक असणाऱ्या एखाद्या जुन्या वसाहतीचा शोध लागू शकतो.

    या शोध मोहिमेत छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे प्रवीण शिंदे यांच्यासह जिज्ञासाचे संदीप वाघुळकर, कुमार गुरव, निलेश पंडित तसेच एलबीएस कॉलेज साताराच्या प्रा. चिकमठ, प्रा. जाधव तसेच शहाजीराजे महाविद्यालयाचे प्रा. साळुंखे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.