लक्षात ठेवा आता हिंदुत्त्ववादी सरकार आहे; कर्जतमधील घटनेने नितेश राणे आक्रमक

कर्जत येथील प्रतीक पवार याने नुपूर शर्मा यांचा डीपी मोबाईलवर लावला म्हणून त्याच्यावर हल्ला हा जीवघेणाच आहे, स्थानिक अधिकारी याला वेगळे कारणे सांगत असले तरी भारतीय जनता पक्ष, हिंदू संघटना आणि आपण स्वतः यात लक्ष घालणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी अहमदनगर इथे माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले.

    अहमदनगर : कर्जत येथील प्रतीक पवार याने नुपूर शर्मा यांचा डीपी मोबाईलवर लावला म्हणून त्याच्यावर हल्ला हा जीवघेणाच आहे, स्थानिक अधिकारी याला वेगळे कारणे सांगत असले तरी भारतीय जनता पक्ष, हिंदू संघटना आणि आपण स्वतः यात लक्ष घालणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी अहमदनगर इथे माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांनी नगरमध्ये धाव घेत खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या प्रतीक पवारची भेट घेत तब्येतीची चौकशी केली.

    नितेश राणे व गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. यावेळी नितेश राणे म्हणाले की, आता अहमदनगर जिल्ह्यात अल्पसंख्यांक मंत्री पालकमंत्री म्हणून नाहीत. राज्यातही महाविकास आघाडीचे सरकार नाही. त्यामुळे दबावात काम करू नका. नगर जिल्ह्यात नुपूर शर्मांच्या नावाखाली एका युवकावर हल्ला झाला. या युवकाबरोबर हल्लेखोरांनी सोशल मीडियावर चर्चा झाली होता. त्याचे पुरावेही आहेत. तरीही हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाल्याचे दर्शविले जात आहे. हे चुकीचे आहे. पोलीस निरीक्षकांनी गुन्हा नुपूर शर्मा प्रकरणातून झालेला असल्याचे सांगितले असताना पोलीस प्रकरण दडपत असल्याचा आरोप राणे यांनी केला. गोपीचंद पडळकर यांनी कर्जतमधील पोलीस निरीक्षक हे कोणावरही खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप केला.

    ते पुढे म्हणाले की, मी प्रतीकला भेटलो. तो मृत्यूशी झुंज देत आहे. त्याला डॉक्टरांनी २४ तास निगरानी खाली ठेवायला सांगितले आहे. त्याला अन्य कारणामुळे मारहान झाली असे पोलिसांचे म्हणणे खोटे आहे. तू हिंदू-हिंदू करतोस, नुपूर शर्माचा डिपी ठेवतोस, म्हणून हा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांबरोबरील प्रतीकचे चॅट पोलिसांनी पहावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

    राज्यात आता हिंदुत्त्वाला माननारे सरकार आहे. हिंदूंना अशा पद्धतीने लक्ष केले जात असेल तर आम्ही शांत बसणारे नाहीत. त्यामुळे कोणी घाबरू नये. असे प्रकार घडल्यास हिंदुत्त्वादी संघटना व पोलिसांकडे तक्रार करावी. कोणी मस्ती करायचा प्रयत्न करू नये. जास्त मस्ती कराल तर लक्षात ठेवा आता हिंदुत्त्वादी सरकार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. या प्रकरणावर त्यांचे लक्ष आहे. जास्त मस्ती कराल तर सर्व प्रकारचे औषध या सरकार जवळ आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

    तपास प्राथमिक अवस्थेत आहे. तपासी अधिकारी जसे पुरावे येतील त्या सर्व पद्धतीने तपास करतील. दोन गटात पूर्वीची वाद, धार्मिक तेढ आहे.

    मनोज पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक