माझी Y+ दर्जाची सुरक्षा काढून घ्या; संतोष बांगर यांनी पोलिसांना पत्राद्वारे केली विनंती

हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी शिंदे गटात सहभागी झाले. बांगर यांनी घेतलेल्या यु-टर्नमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्यांना वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली होती, आता वाय प्लस सुरक्षे संदर्भात बांगर यांनी पोलिसांना पत्र लिहिले आहे.

    हिंगोली : शिवसेनेतील बंडाळीच्या काळात निष्ठावंत म्हणून मिरवून घेतल्यानंतर आणि मतदारसंघात अश्रू ढाळून निष्ठेचे धडे देणारे भाषण करणारे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी शिंदे गटात सहभागी झाले. त्यांच्या शिंदे गटात सहभागी होण्याने विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सरकारच्या बाजूने एका मताची भर पडली. बांगर यांनी घेतलेल्या यु-टर्नमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्यांना वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली होती, आता वाय प्लस सुरक्षे संदर्भात बांगर यांनी पोलिसांना पत्र लिहिले आहे.

    आमदार संतोष बांगर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना लेखी पत्र देत आपल्याला प्रदान करण्यात आलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा काढून घ्या, अशी विनंती केली आहे. मात्र हिंगोली पोलिसांनी बांगर यांच्या पत्रावर अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती दिली आहे.

    दरम्यान मराठवाड्यातील शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून आमदार संतोष बांगर यांची ओळख आहे, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोकणात जाऊन कोथळा काढू अशी धमकी दिल्याने आमदार बांगर हे चर्चेत आले होते, आमदार बांगर हे कायम ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ होते मात्र , एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर त्यांनी देखील शेवटी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात एंट्री केली होती.