मनपा शिक्षण मंडळ अधिकाऱ्याचा पदभार काढला, शिक्षण उपसंचालकांचे आदेश; संजय जावीर यांच्याकडे दिली जबाबदारी

मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी विठ्ठल ढेपे यांचा पदभार काढून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे उप शिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

    सोलापूर : मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी विठ्ठल ढेपे यांचा पदभार काढून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे उप शिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

    पुणे विभागाचे शिक्षण उप संचालक राजेंद्र अहिरे यांनी १९ सप्टेंबर रोजी मनपा आयुक्तांना तातडीने मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकाऱ्याच्या पदभार बदलाचे पत्र पाठविले आहे. वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे (प्राथमिक) अधीक्षक विठ्ठल ढेपे यांच्याकडे मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासन विभागाचा अतिरिक्त कार्यभार ३१ मे रोजी देण्यात आला होता. पण आता प्रशासकीय कारणास्तव पुढील आदेश होईपर्यंत या पदाचा अतिरिक्त कार्यभार प्राथमिकचे उप शिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याकडे सोपविण्यात येत आहे. जावीर यांनी त्यांच्या मूळ पदाचा कार्यभार सांभाळून प्रशासन अधिकारी पदाचा पदभार तात्काळ तात्काळ धारण करावा व तसा अहवाल उप संचालक कार्यालयास सादर करावा असे नमूद केले आहे.

    …या कारणाची चर्चा

    ढेपे यांच्या विरोधात शिक्षक भारती संघटनेने जिल्हा परिषदेसमोर उपोषण केले होते. शिक्षकांची ७७ कोटीची बिले मंजूर करताना टक्केवारीचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शहरातील बचत गटांनी पालकमंत्र्यांना ढेपे यांच्या विरोधात निवेदन दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यापूर्वी पुण्यात असताना त्यांच्यावर लाचलुचपतची कारवाई झाली आहे. शिक्षण आयुक्तांनी राज्यातील शिक्षणाधिकाऱ्याची चौकशी करावी असे लाचलुचपतला पत्र दिले आहे. त्यात ढेपे यांचेही नाव असल्याची चर्चा आहे. शिक्षक संघटना व बचत गटाच्या आरोपानंतर शिक्षण विभागाने त्यांना पदावरून हटविण्याचा निर्णय घेतला असल्याची शिक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

    ढेपे म्हणतात मीच पदभार सोडला

    याबाबत विठ्ठल ढेपे यांनी मात्र मीच पदभार सोडला असल्याचे म्हटले आहे. माझ्याकडे कामाचा भार जास्त आहे. याबाबत मीच वरिष्ठांना कळविले होते असा त्यांचा दावा आहे. पण शिक्षण उपसंचालक अहिरे यांनी जारी केलेल्या आदेशात त्यांची विनंती होती असे कोठेच नमूद केले नसल्याने ढेपे यांच्या दाव्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.