बाणेरमधील अनधिकृत दुकाने हटवली; महापालिकेची अतिक्रमणाविराेधात कारवाई

कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर बाणेर येथे अनधिकृतपणे थाटलेल्या फर्निचरच्या आलिशान दुकानांवर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली.

    पुणे : कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर बाणेर येथे अनधिकृतपणे थाटलेल्या फर्निचरच्या आलिशान दुकानांवर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. कात्रज- देहूरोड बाह्यवळण मार्गावर बाणेर येथे महामार्गाच्या बाजूने अनधिकृतपणे अनेक फर्निचर दुकाने थाटण्यात आली आहेत. कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसतानाही ही दुकाने थाटण्यात आली आहेत. दुकानदारांकडून महापालिकेला कर मिळण्याचा त्यामुळे प्रश्नच नव्हता.

    अनेकदा या दुकानांमुळे वाहतूकीत अडचणी येत असत आणि वाहनचालकांना काेंडीचा सामना करावा लागत असे. येथील अनधिकृत दुकानदारांना पुणे महापालिकेने काही दिवसांपूर्वी नोटीसा दिल्या होत्या. त्यानंतरही ही दुकाने त्याच जागेवर हाेती. नोटिसांना दुकानदारांनी केराची टोपली दाखवली.

    नोटीसा देऊन देखील हे दुकानदार दुकाने हटवत नसल्याने प्रशासनाने अखर कारवाई केली. गुरुवारी सकाळी पुणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक पोलीस बंदोबस्तात या अनधिकृत दुकानांसमोर हजर झाले. अतिक्रमण विभागाने फर्निचरच्या दुकानांवर थेट जेसीबी चालवून दुकाने जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली. कारवाई सुरु होताच अनेक दुकानदारांची पाचावर धारण बसली. काही दुकानदारांनी दुकानातील फर्निचर तत्काळ हटविण्याचे काम सुरु केले. तर काहींनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याही दबावाला बळी न पडता ही कारवाई पूर्ण करण्यात आली.