पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील 760 एमएलडी पाणी आरक्षित करा; महापालिकेचे जलसंपदा विभागाला पत्र

पिंपरी-चिंचवड शहराच्या सध्याचा लोकसंख्या वाढीचा दर आणि सन 2041 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन वाढीव पाण्याची गरज आहे. ही गरज लक्षात घेता मुळशी धरणातून 760 एमएलडी पाणी शहरासाठी आरक्षित करावे, अशा मागणीचे पत्र पालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाला नुकतेच दिले आहे.

    पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या सध्याचा लोकसंख्या वाढीचा दर आणि सन 2041 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन वाढीव पाण्याची गरज आहे. ही गरज लक्षात घेता मुळशी धरणातून 760 एमएलडी पाणी शहरासाठी आरक्षित करावे, अशा मागणीचे पत्र पालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाला नुकतेच दिले आहे. तसेच यासाठी लागण्यात येणारा पुनर्स्थापना खर्च देण्यास पालिका तयार असल्याचेही म्हटले आहे.
    पिंपरी-चिंचवड शहराला गेल्या चार वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. शहर चारही बाजूने झपाट्याने वाढत असताना लाेकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या शहराची सुमारे 30 लाखांच्या घरात लाेकसंख्या आहे. शहरासाठी पवना धरणातून 510, आंद्रातून 100, भामा-आसखेड धरणाचे 167 असे 777 एमएलडी पाणी आरक्षित आहे. सध्या शहरवासियांना पवना धरणातून 510, आंद्रा धरणातून 75 आणि एमआयडीसीकडून 20 असे 605 एमएलडी पाणी देण्यात येत आहे. त्यानंतरही शहरातील विविध भागातील साेसायट्यांना कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा हाेत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
    सध्याच्या लाेकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेता शहराची 2031 मध्ये 52 लाख 74 हजार तर 2041 मध्ये 96 लाख 3 हजार लाेकसंख्या हाेईल, असे अनुमान गृहित धरण्यात आले आहे. या लाेकसंख्येला सुमारे 1500 एमएल़डी पाणी लागणार आहे. त्यामुळे भविष्याचे आतापासून नियाेजन करणे काळाची गरज आहे. त्यानुसार महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तयारी सुरू केली आहे. लाेणावळा येथील टाटा कंपनीच्या मुळशी धरणातून 760 एमएलडी पाणी मिळावे, असे पत्र पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जलसंपदा विभागाला दिले आहे.
    असे वापरणार महापालिका पाणी 
    मुळशी धरणातून पाणी पिंपरी-चिंचवडसाठी 760 एमएलडी आरक्षित करावे. पिण्याचे पाण्याचे आरक्षण औद्योगिक, व्यावसायिक वघरगुती या प्रकारामध्ये विभागून देणे आवश्यक आहे. औद्योगिक व व्यावसायिक कारणांसाठी 1.50 टक्के व उर्वरीत 98.50 टक्के घरगुती पिण्याच्या प्रयोजनात वापरले जाणार आहे.

    लाेकसंख्या वाढीचा विचार करता मुळशी धरणातून 760 एमएलडी पाणी शहरासाठी आरक्षित करावे, यासाठी जलसंपदा विभागाला पत्र दिले आहे. शासन सकारात्मक निर्णय घेईल, ही अपेक्षा.

    - श्रीकांत सवणे, मुख्य अभियंता.