पालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रतिसाद ! शाळेची पटसंख्या हजारावर

पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरू केलेल्या दळवीनगर व भोसरीतील दोन इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शहरातील पालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. खासगी शाळांऐवजी या शाळांमध्ये प्रवेश घेण्याला पालकांचे प्राधान्य दिसत आहे.

    पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरू केलेल्या दळवीनगर व भोसरीतील दोन इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शहरातील पालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. खासगी शाळांऐवजी या शाळांमध्ये प्रवेश घेण्याला पालकांचे प्राधान्य दिसत आहे. ६४ विद्यार्थी संख्येवर सुरू झालेल्या या शाळांची पटसंख्या आता११२३ वर पोचली आहे.

    महापालिकेच्या शाळांतील शिक्षणाचा दर्जा खालावल्याने अनेक पालकांनी या शाळांकडे पाठ फिरवली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. २० वर्षांपूर्वी महापालिका शिक्षण मंडळाने चिंचवड-दळवीनगर आणि भोसरी शाळेच्या आवारात “इंग्रजी माध्यमाच्या शाळा’ सुरू केल्या.

    इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश घेण्यासाठी पालकांना हजारो रुपयांचे शुल्क भरावे लागत आहे. शिवाय त्या शाळांचा मनमानी कारभार देखील सहन करावा लागत आहे. खासगी शाळांची ही अडचण पाहता महापालिकेने सुरू केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे शहरातील नागरिकांचा वाढता कल दिसत आहे. शिक्षणही निःशुल्क सुरू केल्याने सर्वसामान्य पालकांना पर्याय मिळाला आहे.

    शुल्क नसल्याने विद्यार्थ्यांना देखील त्याचा मोठा फायदा होत आहे. या शाळांमध्ये आतापर्यंत सुमारे ७ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून धडे गिरविले असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता या दोन शाळा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे आणखी शाळा वाढविण्याची गरज असल्याचे पालक सांगत आहेत.