पुणे शहराला अंमली पदार्थाच्या विळख्यातून सोडवा; शिवसेना ठाकरे गटाची पोलिस आयुक्तांकडे मागणी

    पुणे : पुणे शहराला अंमली पदार्थांच्या विळख्यातून सोडवा, अशी मागणी शिवसेनेने (ठाकरे गट) पोलिस आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात पक्षाच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरात अंमली पदार्थ तस्करीचे प्रकार समोर आले आहेत, तसेच ससून रुग्णालयात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, विधानसभाप्रमुख विशाल धनवडे, उत्तम भुजबळ, राजेश मोरे, अनंत घरत, मकरंद पेठकर यांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची शुक्रवारी भेट घेऊन निवेदन दिले.

    विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याला ड्रग्जचा विळखा

    विद्येचे माहेरघर, आयटी हब अशी पुण्याची ओळख आहे. अशा या शहरांत आता ड्रग्ज, गांजा , गुटखा , या सारखे अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचे गेल्या काही घटनांमधून निदर्शनास आले आहे. पुणे पोलीसांनी ड्रग्ज व्यावसायिकाला पकडल्यामुळे खूप मोठ रॅकेट हाती लागले आहे. त्याची पाळेमुळे खूप खोलवर रुजलेली आहेत. जे कोणी छोटे मोठे उत्पादक, व्यावसायिक, हितसंबंधित व्यक्ती अथवा राजकीय वरदहस्त ठेवलेले नेते या रॅकेटमधे सहभागी असतील त्या प्रत्येकावर कारवाई करून त्याचा तपास निष्पक्षपातीपणे व्हावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

    महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा पुण्यात सहज उपलब्ध
    तसेच अत्यंत महत्वाचे पुणे शहरात शाळा महाविद्यालयांच्या जवळ, वस्ती भागात अनेक पान टपऱ्यांमध्ये , दुकानांमध्ये तसेच काही व्यक्तींकडे आरोग्याला घातक गोष्टी सहज उपलब्ध होत आहेत आणि सर्रासपणे विकल्या जात आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा पुण्यात सहज उपलब्ध होऊन सर्रास पणे विकला जात आहे. आमच्या माहितीप्रमाणे रोज 20 कोटी रू चा गुटखा पुण्यात आणला जातो. बिनदिक्कतपणे त्याची विक्री होते याचा देखील गांभीर्याने िवचार करावा असेही निवेदनात नमूद केले अाहे.