देशात इन्फ्लुएन्झा H3N2 चा वाढता धोका, व्हायरसमुळे आत्तापर्यंत 9 जणांना मृत्यू, 2 जण महाराष्ट्रातील; आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार महत्त्वाची बैठक

राज्यात इन्फ्लुएन्झा H3N2चा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत हेही उपस्थित असतील.

मुंबई– दिल्ली, गुजरात,महाराष्ट्रासह (Including Delhi, Gujarat, Maharashtra) देशातील इतर राज्यातही इन्फ्लुएन्झा (Influenza)  H3N2 चा धोका वाढला आहे. या व्हायरसमुळे (Virus) आत्तापर्यंत देशात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूचा सर्वाधिक प्रभाव हा महाराष्ट्रात दिसतोय. इन्फ्लुएन्झा H3N2 चे 352 रुग्ण आत्तापर्यंत राज्यात सापडले आहेत. मुंबई महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत मुंबईत 32 रुग्ण आहेत, त्यातील 4 रुग्ण हे इन्फ्लुएन्झा H3N2 चे आहेत तर 28 रुग्ण इन्फ्लुएन्झा H1N1 चे आहेत. या सगळ्या रुग्णांची स्थिती सध्या स्थिर आहे. राज्यात इन्फ्लुएन्झा H3N2चा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत हेही उपस्थित असतील.

राज्यात आत्तापर्यंत दोघांचा मृत्यू
इन्फ्लुएन्झा H3N2 या विषाणूमुळे राज्यात आत्तापर्यंत दोघाजणांचा बळी गेल्याचं सांगण्यात येतंय. नगर जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण घेणारा एक विद्यार्थी गेल्या आठवड्यात आपल्या मित्रांसह अलिबागला आला होता. तिथून परतल्यानंतर त्याची प्रकती खालावली होती.

राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्टवर

इन्फ्लुएन्झा H3N2 विषाणूनं संक्रमित झालेल्या रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे. तसचं राज्यातील आरोग्य यंत्रणा आणि हॉस्पिटल्सना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. इन्फ्लुएन्झा H3N2विषाणू हा जीवघेणा नाही, उपचारानं रुग्ण बरे होत आहेत, असंही ते म्हणाले. लोकांनी घाबरुन जाून नये असं आवाहनही करण्यात आलं आहे.

इन्फ्लुएन्झा H3N2 ची लक्षणे
1.इन्फ्लुएन्झा H3N2 विषाणूमुळे थंडी वाजते आणि कफ होतो.
2. खोकला येणे
3. नाकातून पाणी वाहणे किंवा नाक बंद होणे
4. डोकेदुखी
5. ताप येणे
6. अंगदुखी
7. थंडी वाजणे
8. दमल्यासारखे वाटणे
9. श्वास लागणे
10. पोटदुखी
11. उलट्या होणे

लक्षणं असतील तर हे कराच
1. लक्षण जाणवत असतील तर थोड्या-थोड्या वेळानं हात स्वच्छ धुवा
2. कुणाच्याही संपर्कात जाऊ नका, हस्तांदोलन टाळा
3. खोकताना रुमालाचा उपयोग करा
4. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका
5. पाणी सतत प्या
6. कोणत्याही गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या
7.नाकाला आणि डोळ्याला हात लावू नका
8. एकाच ताटात दुसऱ्या व्यक्तीसोबत अन्न शेअर करु नका