शहादा ते प्रकाशा दरम्यान रस्त्याची दुरवस्था, खड्डे बुजवण्यासाठी मागणीसाठी आंदोलन

    नंदुरबार : सेंधवा ते विसरवाडी राष्ट्रीय महामार्गावरील कॉंक्रिटीकरणचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून शहादा ते प्रकाशा दरम्यान रस्त्याचे काम अपूर्ण असून या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या महामार्गावरील तापी आणि गोमाई नदीवरील पूलांची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर गेल्या आठ महिन्यात झालेल्या विविध अपघातात 18 जणांना आपला जीव गमावा लागला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.

    यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी आणि वाहनधारकांनी वारंवार रस्ते विकास महामंडळ आणि संबंधित ठेकेदारांना निवेदन देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने तसेच गेल्या आठवड्याभरात झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. नागरिकांनी निवेदन देऊनही रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने आज गोमाई नदी पुलावर शहादा तालुक्यातील सर्व पक्ष नेते आणि प्रकाशा परिसरातील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले. भर पावसात झालेल्या रस्ता रोको आंदोलनात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी स्थानिक आमदार व खासदार यांच्या विरोधातही नागरिकांनी रोष व्यक्त केला. रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलनाच्या वेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला व संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.