स्टॉर्म वॉटरलाइन तुंबल्याने रस्ता जलमय, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिक त्रस्त

चिखली येथील वाघू साने चौक ते चिंचेचा मळा मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. हे पाणी पावसामुळे साचलेले नसून महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे रस्ता जलमय झाला आहे.

    पिंपरी : चिखली येथील वाघू साने चौक ते चिंचेचा मळा मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. हे पाणी पावसामुळे साचलेले नसून महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे रस्ता जलमय झाला आहे. गुरुवारी (दि.२५) दुपारी स्टॉर्म वॉटरलाइन तुंबल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. येथील स्टॉर्म वॉटरलाइनची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

    चिखली, मोरेवस्ती, साने चौक आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर ड्रेनेजलाइनच्या समस्या आहेत. वारंवार ड्रेनेजलाइन, स्टॉर्म वॉटर लाइन तुंबत असल्याने दूषित पाणी रस्त्यांवर वाहत आहे. परंतु महापालिकेचा ड्रेनेजलाइन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

    वाघू साने चौक ते चिंचेचा मळा या मार्गावर वाहनांची व नागरिकांची मोठी वर्दळ असते. मोरेवस्तीतील अष्टविनायक चौक, चिंचेचा मळा, विठ्ठल नगर, झेंडा चौक आदी लहान मोठ्या सोसायट्या यांना ये-जा करण्यासाठी हा मार्ग प्रमुख आहे. परंतु मागील तीन दिवसांपासून या मार्गावर मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी वाहत असल्याने रस्ता जलमय झाला आहे. त्यामुळे पादचारी व दुचाकी वाहनचालकांना येथून ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर गुडगाभर पाणी साचून राहिल्याने सायकलस्वार, चारचाकी वाहनांना अडचणी येत आहेत.