महामार्गावर रात्री पाच कोटी १५ लाख लुटणारे दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात

न्यायालयात हजर करण्यात आल्यावर २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग असून, पोलीस त्यांचा तपास करीत आहेत.

    वसई । रविंद्र माने : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रात्रीच्या वेळी दरोडा टाकून पाच कोटी १५ लाख रुपये लुटणाऱ्या दरोडेखोरांना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. गुजरातच्या व्यापाऱ्याचे पाच कोटी पंधरा लाख रुपये घेऊन त्यांचे तीन कर्मचारी १७ मार्चला रात्री कारने सुरतहून मुंबईला जात होते. त्यावेळी त्यांच्या कारच्या चालकाने महामार्गावरील खानिवडे टोल प्लाझा जवळ तोंडावर पाणी मारण्यासाठी गाडी थांबवली. त्याचवेळी एका मारुती कारमधून आलेल्या पाच जणांनी पोलीस असल्याची बतावणी करुन त्यांची कार अडवली. त्यानंतर त्यांना मारहाण करुन अपहरण करत कारमध्ये असलेली रोख रक्कम त्या कथीत पोलिसांनी पळवली. दरम्यान, अपहरण करण्यात आलेल्या दोघांना त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी उतरवून, त्यांचे मोबाईल फेकून दिले.

    या धाडसी दरोड्यानंतर व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्यांनी कसेबसे मांडवी पोलीस ठाणे गाठून सदर प्रकार सांगितला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मांडवी पोलीसांनी ३१५, ३६३, ४११, ४२०, ३४१, १७०, १२० (च) कलमान्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. या दरोडेखोरांची तात्काळ उकल करणे आवश्यक असल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. गुन्हे शाखा कक्ष-३ ने तात्काळ तपास करुन तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे माटुंगा-मुंबई येथील मुरगनंदन अभिमन्यु, कांदीवलीतील बाबु मोडा स्वामी, भाईंदर येथील मनीकंदन चलैया आणि सायन येथेली वालाप्रभु शनमुगम या चौघांना अटक केली.

    त्यांची कसून चौकशी केल्यावर या दरोड्याचा प्रकार उघड झाला. अटक करण्यात आलेल्यांमधील बाबु मोडा स्वामी या व्यापाऱ्याचे पैसे घेऊन जाणाऱ्या गाडीचा चालक आहे. त्यांची कसून चौकशी केल्यावर, त्यांनी गुन्हा कबूल केला. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यावर २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग असून, पोलीस त्यांचा तपास करीत आहेत.

    अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ४ कोटी ८७ लाख, ५० हजार रोख रक्कम, १३ लाख रुपये किंमतीच्या दोन कार, २ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा पाच कोटी तीन लाख पंधरा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा पूर्व इतिहास पडताळला असता, मुरगनंदन अभिमन्यू याच्या विरोधात ३०२ कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, तुषार दळवी, अतिश पवार, मनोहर तारडे, प्रविण वानखेडे गणेश यादव, सागर सोनवणे संतोष चव्हाण यांनी ही कामगिरी केली.