वृध्द दाम्पत्याच्या घरावर दरोडा, हातपाय बांधले अन्…

घरी कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी वृध्द दाम्पत्यास मारहाण करीत त्यांचे हातपाय बांधून घरातील हजारो रुपये किमतीचे घड्याळ, हातातील सोन्याच्या बांगड्या व कर्नफुले असा सुमारे ७ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले.

  म्हसवड : म्हसवड शहरातील विश्रामगृह परिसरात राहणाऱ्या वृध्द दाम्पत्याच्या घरी चोरटे गेले आणि आम्ही आपल्या मुलाचे मित्र आहोत. त्यांना लग्न पत्रिका द्यायची आहे, असे सांगत चाेरट्यांनी घरात प्रवेश केला. घरी कोणी नसल्याचे पाहून वृध्द दाम्पत्यास मारहाण करीत त्यांचे हातपाय बांधून घरातील हजारो रुपये किमतीचे घड्याळ, हातातील सोन्याच्या बांगड्या व कर्नफुले असा सुमारे ७ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले.

  बुधवारी (दि. १०) रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात भिती निर्माण झाली आहे. येथील विश्रामगृह परिसरात राजाराम गणपत केवटे (वय ७५) पत्नी सिंधुबाई राजाराम केवटे (वय ६७) यांच्यासोबत एका घरात रहात असून, त्यांचा मुलगा संदीप राजाराम केवटे कृषि अधिकारी आहेत. ते नोकरीनिमित्त सातारा येथे आपल्या पत्नी व मुलांसमावेत रहावयास आहेत.

  केवटे यांची एक विवाहित मुलगी म्हसवड येथे याच परिसरात रहावयास आहे. तिचे त्यांच्याकडे नेहमी लक्ष आहे. तर मुलगाही सुट्टीदिवशी गावी येतात. सध्या प्रचंड उकाडा जाणवत असल्याने बुधवारी रात्री नऊच्या सुमारास जेवन आटोपून राजाराम केवटे घराच्या बाहेरील ओट्यावर बसले होते, तर त्यांची पत्नी घरातील कामे आटोपण्यात मग्न होत्या.

  यादरम्यान दोन दुचाकीवरुन चार जण केवटे यांच्या घरासमोर आले. त्यांनी आम्ही आपला मुलगा संदीपचे मित्र आहे. त्यांना लग्नपत्रिका द्यायची आहे, असे सांगून घरात प्रवेश केला. याबाबत राजाराम केवटे यांनी म्हसवड पोलीसांत फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे अधिक तपास करीत आहेत.

  पेन मागण्याचा बहाणा केला

  चौघापैकी एकाने पत्रिका लिहिण्यासाठी त्यांच्याकडे पेन मागितला. केवटे पेन आणण्यासाठी वळले असता पाठीमागून एकाने त्यांना पकडले तर एकाने त्यांचे हात पकडून खल्लास करीन, असा दम देत त्यांचे हातपाय बांधले. अन्य एकाने सोबत आणलेला चिकटटेप त्यांच्या तोंडाला गुंडाळल्याने केवटे यांना कसलीच हालचाल करता आली नाही. या घटनेने‌ विश्रामगृह परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  पत्नीच्या ताेंडाला चिकटटेप गुंडाळला

  बाहेर कोण आले आहे, हे पाहण्यासाठी केवटे यांच्या पत्नी बाहेरच्या रुममध्ये आल्या असता बाहेरील दृष्य पाहुन त्या हादरल्या. त्याचवेळी अन्य एकाने सिंधुबाई केवटे यांचे तोंड दाबत त्यांचे हातपाय बांधून त्यांच्याही तोंडाला चिकटटेप गुंडाळला. त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या व कानातील सोन्याची कर्नफुले काढली. घरात त्यांच्या मुलाने बाहेरील देशातून आणलेली घड्याळही चोरट्यांनी चोरुन पोबारा केला.