जातेगाव बुद्रुकमध्ये दोन घरांवर दरोडा ; पाच जणांपैकी एकाला ग्रामस्थांनी पकडले

जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथे मध्यरात्रीच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी दरवाजाचे कडी कोयंडे तोडून घरात प्रवेश करुन महिलेला मारहाण करत ठार मारण्याची धमकी देत गळ्यातील दागिने हिसकाले. तसेच दुसऱ्या घरावर दरोडा टाकत असताना ग्रामस्थांनी पाठलाग करुन एकाला पकडले.

    शिक्रापूर : जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथे मध्यरात्रीच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी दरवाजाचे कडी कोयंडे तोडून घरात प्रवेश करुन महिलेला मारहाण करत ठार मारण्याची धमकी देत गळ्यातील दागिने हिसकाले. तसेच दुसऱ्या घरावर दरोडा टाकत असताना ग्रामस्थांनी पाठलाग करुन एकाला पकडले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील सुमित दरेकर व त्यांचे कुटुंब घरात झोपलेले असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पाच अज्ञात व्यक्तींनी दरवाजाचे कडी कोयंडे तोडून घरात प्रवेश केला. दरम्यान त्यांनी घरातील हिराबाई दरेकर यांना मारहाण करत ठार मारण्याची धमकी देऊन गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा केला. यावेळी हिराबाई यांनी आरडाओरडा केल्याने सर्वजण जागे झाले. मात्र काही वेळातच शेजारील पोपट उमाप यांच्या घरात चोरट्यांनी मोर्चा वळवला.  तेव्हा उमाप कुटुंबीय जागे झाले त्यावेळी घरातून ओरडण्याचा आवाज आल्याने सर्वजण तिकडे गेले.

    चोरट्याला ठेवले बांधून

    उमाप यांच्या घरातून चोरटे पळून जात असताना उमाप कुटुंबीयांनी त्यांचा पाठलाग केल्याने एक चोरटा तारेला अडकून पडल्याने त्याला पकडण्यात ग्रामस्थांना यश आले. यावेळी ग्रामस्थांनी चोरट्याला बांधून ठेवत पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, लहानू बांगर, शंकर साळुंके, पोलीस शिपाई प्रतिक जगताप, जयदीप देवकर यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांनी बांधून ठेवलेल्या चोरट्याला ताब्यात घेतले. दरम्यान तारेला अडकल्याने तो जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले.

    दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंधारे, पोलीस हवलदार योगेश नागरगोजे, राजू मोमीन यांसह आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तपासाबाबत योग्य सूचना दिल्या आहेत.  या प्रकाराबाबत सुमित रावसाहेब दरेकर (वय २३ वर्षे रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस  ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी संदीप पंडित भोसले (वय ४५ वर्षे रा. कोळगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) याच्यासह त्याच्या चार साथीदारांवर दरोड्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व पोलीस शिपाई प्रतिक जगताप हे करत आहे.