दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, चौघांना अटक; दोन पिस्टल, गावठी कट्टा, जिवंत काडतुससह मुद्देमाल जप्त

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी शहर पोलिसांनी जेरबंद केली. शिवाजी स्टेडीयम परिसरातील ईदगाह मैदान रोडकडेच्या झुडपांच्या आडोशाला अंधारामध्ये असलेले पाचजण दरोडा टाकण्याच्या तयारीत होते.

    कराड : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी शहर पोलिसांनी जेरबंद केली. शिवाजी स्टेडीयम परिसरातील ईदगाह मैदान रोडकडेच्या झुडपांच्या आडोशाला अंधारामध्ये असलेले पाचजण दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्याची माहिती शहर पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले.

    परशुराम उर्फ परशा रमेश करवले (वय २३, रा. सोमवार पेठ, कराड) निशीकांत निवास शिंदे (वय २१, रा. रेठरेकर कॉलनी, शनिवार पेठ, कराड), तुषार उर्फ बारक्या सुभाष थोरवडे (वय २३, रा. बुधवार पेठ, कराड), आकाश उदय गाडे (वय १९, रा. बुधवार पेठ, कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एक संशयित पसार झाला. त्यांच्याकडुन दोन देशी बनावटीचे पिस्टल, पाच जिवंत काडतुस, गावठी कट्टा, त्यात वापरणेत येणारे राऊंड, एक लोखंडी टॉमी, मिरची पुड, माकडटोपी, काळ्या रंगाचा कापडी मास्क असा एक लाख ७१ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयम परिसरातील ईदगाह मैदान रोडच्या बाजुला झुडपांच्या आडोशाला अंधारामध्ये परशुराम करवले, निशीकांत शिंदे, तुषार उर्फ बारक्या थोरवडे, आकाश गाडे व अन्य एकजण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याची माहिती पोलीस उपाधिक्षक अमोल ठाकुर, पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजु डांगे व सहकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित ठिकाणी जावुन संशयितांना ताब्यात घेतले.

    चार दिवसांची पोलीस कोठडी

    संशयितांची झडती घेतली असता दोन देशी बनावटीचे पिस्टल, पाच जिवंत काडतुस एक गावठी कट्टा, त्यात वापरण्यात येणारा राऊंड, एक लोखंडी टॉमी, मिरची पुड, माकडटोपी, काळ्या रंगाचा कापडी मास्क असा एक लाख ७१ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.