
केवळ १७ खासगी ट्रॅव्हल्सवर आरटीओकडून कारवाई , आरटीओची केवळ बघ्याची भूमिका
पुणे : उन्हाळी सुट्यांमुळे सध्या बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. याचाच फायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांकडून दुप्पट अथवा तिप्पट भाडे वसुली सुरू आहे. याचवेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. मात्र प्रवासी तक्रारी करत नसल्याने कारवाई केली जात नसल्याची भूमिका आरटीओने घेतली आहे.
खासगी ट्रॅव्हल्सला एसटीच्या आरामदायी बसच्या तिकिटाच्या दीडपट भाडे आकारता येते. प्रत्यक्षात खासगी ट्रॅव्हल्सचालक दुप्पट ते तिप्पट भाडे आकारत आहेत. याबाबत प्रवासी वारंवार तक्रारी करीत आहेत. असे असतानाही गर्दीच्या ऐन हंगामात केवळ १७ खासगी ट्रॅव्हल्सवर आरटीओकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यातील केवळ एकाच ट्रॅव्हल्सवर जादा भाडे आकारल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. इतरांवर वेगवेगळ्या कारणांसाठी कारवाई झालेली आहे.
उन्हाळी सुट्यानिमित्त अनेकजण बाहेरगावी जातात. यामुळे सध्या एसटी गाड्यांचे आरक्षण फुल आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सकडे प्रवासी वळतात. याचाच फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. याचवेळी आरटीओकडून सुरू असलेली कारवाई ही केवळ दिखाव्यासाठी असल्याची तक्रार प्रवासी करीत आहेत. कारण प्रत्येक वेळी गर्दीच्या हंगामात खासगी ट्रॅव्हल्सकडून दरवाढ केली जाते, परंतु त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
खासगी ट्रॅव्हल्सकडून जादा भाडे आकारले जात असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आलेल्या नाहीत. प्रवाशांनी तक्रारीच केल्या नाहीत तर कशाचा आधारे आम्ही कारवाई करणार? प्रवाशांनी त्यांच्याकडून खासगी ट्रॅव्हल्सने जादा भाडे घेतल्यास पावतीसह आमच्याकडे तक्रार करावी. आम्ही तातडीने कारवाई करू
डॉ. अजित शिंदे यांनी सांगितले, प्रादेशिक परिवहन अधिकारी