दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची लूट! खाजगी प्रवासी बसचे भाडे दुप्पट

दिवाळीनिमित्त पुण्यातून मूळ गावी जाणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांची संख्या मोठी असते. यामुळे या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह खाजगी वाहतुकीला मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन खाजगी प्रवासी बसमालकांनी प्रवाशांची लूट सुरू केली आहे.

    पुणे : दिवाळीनिमित्त पुण्यातून मूळ गावी जाणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांची संख्या मोठी असते. यामुळे या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह खाजगी वाहतुकीला मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन खाजगी प्रवासी बसमालकांनी प्रवाशांची लूट सुरू केली आहे. बसमालकांनी दिवाळीच्या काळासाठी दुप्पट भाडे आकारण्यास सुरुवात केली आहे. मात्र, याप्रकरणी खासगी बसच्या संघटनेने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) बोट दाखविले आहे.

    पुण्याहून दररोज सुमारे पाचशेहून अधिक खाजगी बस महाराष्ट्राच्या विविध भागांत जातात. या व्यतिरिक्त मुंबईहून येणाऱ्या पाचशे खाजगी बस पुण्यातून पुढे मार्गस्थ होतात. पुण्यातून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रवाशांची संख्या अधिक असते. दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी असते. प्रवाशांची संख्या वाढण्याच्या काळात बसचे भाडे वाढविण्याचे प्रकार केले जातात. दिवाळीच्या तोंडावर आता खासगी बसचालकांनी भाडे दुपटीहून अधिक वाढविले आहे. यामुळे प्रवाशांना मोठा भुर्दंड बसत आहे.

    खाजगी प्रवासी बसला एसटी बसच्या प्रतिकिलोमीटर भाडेदराच्या दीडपट भाडे आकारता येते. याबाबतचे कमाल भाडेदर सरकारने २७ एप्रिल २०१८ रोजी निश्चित केले आहेत. काही खाजगी प्रवासी बस सणासुदीच्या व गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र, जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.

    याप्रकरणी पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशनने १७ ऑक्टोबरला प्रादेशिक परिवहन कार्यालयाला पत्र पाठविले होते. या पत्रावर आरटीओकडून संघटनेला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. पत्रात म्हटले आहे, की खाजगी बसचे दर आरटीओने निश्चित करून द्यावेत. आम्ही नियमानुसार एसटीच्या तिकिटाच्या दीडपट भाडे आकारत आहोत. हे दीडपट दर केवळ दिवाळीच्या आठ दिवसांच्या कालावधीत असतात. आरटीओने आम्हाला दर निश्चित करून दिल्यास त्याचे पालन आमच्याकडून केले जाईल. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या बसमालकांवर आरटीओने कारवाई करावी.

    नियमापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी बसची तपासणी करण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. भाडेवाढ करणाऱ्या बसमालकांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. याबाबत खाजगी बसच्या संघटनांसोबत सोमवारी बैठक घेतली जाणार आहे.

    – संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी

    आम्ही दहा दिवसांपूर्वीच आरटीओकडे खाजगी बसचे दरपत्रक निश्चित करण्याची मागणी केली आहे. आम्हाला ते दरपत्रक अद्याप मिळालेले नाही. निश्चित केलेल्या भाड्यापेक्षा जास्त दर आकारल्यास संबंधित बसमालकाला संघटनेतून बाहेर काढण्यात येईल.

    – बाळासाहेब खेडेकर, अध्यक्ष, पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशन