
तासगाव-सांगली रोडवरील तासगाव हद्दीतील गणेश कॉलनी इथे अंधाराचा फायदा घेत स्कॉर्पिओ गाडी अडवून, द्राक्ष व्यापारी आणि इतर दोघांना मारहाण करुन आरोपींनी कोट्यवधी रुपये लुटून नेले.
सांगली: जिल्ह्यातील तासगावमधुन (Tasgaon) एका द्राक्ष व्यापाऱ्यासोबत लूटमार झाल्याची घटना समोर आली आहे. अंधाराचा फायदा घेत मागावर असलेल्या अज्ञात चोरट्यांनाी द्राक्ष व्यापाऱ्याच्या स्कॉर्पिओ गाडीतुन 1 कोटी 10 लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. महेश शितलदास केवलानी असं द्राक्ष व्यापाऱ्याचं नाव आहे.
कुठं घडली घटना
तासगावमधील दत्तमाळ गणेश कॉलनीतील ही धक्कादायक घटना घडली आहे. महेश शितलदास केवलानी हे द्राक्ष व्यापारी मूळचे नाशिकचे असून सध्या तासगावमधील गणेश कॉलनीत राहतात. तासगाव शहरासह तालुक्यातील द्राक्ष गेल्या चार ते पाच वर्षापासून ते खरेदी करत आहेत, ही द्राक्षे ते बांगलादेश इथे पाठवतात. यावर्षीही ते द्राक्ष खरेदी करुन दरवर्षाप्रमाणे पाठवत आहेत. याच द्राक्षाचे पैसे आणण्यासाठी ते मंगळवारी (28 मार्च) स्कॉर्पिओ गाडीतून चालक आणि कर्मचाऱ्यासह सांगली इथे गेले होते. पैसे घेऊन ते गणेश कॉलनीकडे परत येत असताना काही जणांनी त्यांची गाडी अडवली. यापैकी काही जणांनी शस्त्राचा धाक दाखवुन त्यांच्या गाडीतील पैशाची बॅग बळजबरी हिसवकावुन घेतली आणि पळ काढला. या घटनेनंतर द्राक्ष व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार केली असुन तपास सुरू आहे.
आठ ते दहा जण आले होते एकत्र
द्राक्ष व्यापाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका गाडीने आलेल्या जवळपास सहा ते सात जणांनी त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीला अडवत स्वताची गाडी लावली आणि त्यांना थांबवले. त्यांनतर चालकाला दमदाटी करत बाहेर येण्यास सांगितले आणि मागे बसलेल्या द्राक्ष व्यापारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्याला गाडीच्या बाहेर काढत मारहाण केली. तसेच , त्यांच्याकडे असलेली पैशाची बॅक हिसकावली. काही लोक एका दिशेने आणि काही लोक दिसऱ्या दिशेने निघून गेल्याचे त्यांनी सांगितल. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुखांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरु केला.