रोहित पाटील यांचे उपोषण स्थगित ; एक महिन्यात २८ गावांसाठी सुप्रमा देण्याचे जलसंपदा विभागाचे आश्वासन 

एक महिन्याची मर्यादा न पाळल्यास मंत्राल्यासमोर उपोषण 

    सांगली : तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघातील २८ गावांचा टेंभू योजनेत समावेश करण्यासाठी उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महिन्याचा कालावधी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर रोहित पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांनी आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले.दरम्यान एक महिन्यात शासनाने काल मर्यादा न पाळल्यास आम्ही यानंतर मंत्राल्यासमोर शेतकऱ्यांना घेऊन उपोषणाला बसणार असल्याचा इशारा यावेळी रोहित पाटील यांनी दिला.
    उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी सुरवातीला जिल्हाधिकारी यांना याबाबत पत्र देण्याच्या सूचना दिल्या, मात्र रोहित पाटील यांनी सचिवांच्या सहीचे पत्र मागितले, त्यावर या गावांचा सुप्रमा देण्याचे पत्र सचिव यांनी पाठवले, हे पत्र जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी आंदोलनस्थळवर दिले, तर आमदार अनिल बाबर यांच्याहस्ते पाणी घेऊन रोहित पाटील यांनी आंदोलन स्थगित केले.
    उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रम्हणध्वनी वरून संपर्क साधून या १८ गावांच्या समावेश टेंभू योजनेत करून त्याना सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागतो मात्र आम्ही एका महिन्यात ती देण्याचा विश्वास देतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.
    तासगाव तालुक्यातील सावळज, सिद्धेवाडी, दहिवडी, जरंडी, यामगरवाडी, वायफळे, बिरणवाडी, डोंगरसोनी, वडगाव, लोकरेवाडी तर कवठेमहांकाळ तालुक्यातील जाखापूर, कुंडलापूर, गर्जेवाडी, रायवादी, केरेवाडी आणि शेळकेवाडी या गावांना टेंभू योजनेत समावेश करून त्या गावांना पाणी देण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.
    शरद पवारांचीही विनंती 
    दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोहित पाटील यांच्याशी संपर्क साधून मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे, याबाबत लवकरच निर्णय होईल, तब्बेत बिघडली आहे, तोपर्यंत उपोषण मागे घ्यावे असेही यावेळी त्यांनी सांगितले. दरम्यान रोहित पाटील यांनी या गावातील लोकांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले.