
राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी सुरु केलेल्या युवा संघर्ष यात्रेमध्ये मनोज जरांगेंना पाठींबा म्हणून आ. पवार यांनी एक दिवस अन्नत्याग उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते.
शिक्रापूर : राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी सुरु केलेल्या युवा संघर्ष यात्रेमध्ये मनोज जरांगेंना पाठींबा म्हणून आ. पवार यांनी एक दिवस अन्नत्याग उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते. सणसवाडी ते उरळगाव या दरम्यान पायी संघर्ष यात्रा करत एक दिवस अन्न त्याग उपोषण केले होते. रात्री उशिरा रतन वडघुले व द्वारकाबाई सावंत या ज्येष्ठ महिलांच्या हस्ते त्यांनी उपोषण सोडले.
सणसवाडी (ता. शिरुर) येथून युवा संघर्ष यात्रा जात असता मनोज जरांगे यांनी त्यांचे उपोषण सुरु केले असल्याने यावेळी बोलताना सरकारने दिलेले आरक्षण कोर्टात टिकले पाहिजे. कोणीही त्या आरक्षणाला विरोध केला नाही पाहिजे, एक सामाजिक कार्यकर्ता आरक्षणासाठी उपोषणाला बसत असेल तर मी देखील एक दिवस दिवसभर अन्नत्याग करणार असून दिवसभरात मी अन्नाचा कण देखील घेणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. गुरुवारी युवा संघर्ष यात्रेतून चालत एक दिवशीय अन्नत्याग आंदोलन केले. त्यांनतर रात्री उरळगाव येथे मुक्काम करत असताना आ. पवार यांनी रतन वडघुले व द्वारकाबाई सावंत या ज्येष्ठ महिलांच्या हस्ते उपोषण सोडले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव युवा नेते रोहित पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी संचालक पंडित दरेकर, ज्ञानेश्वर थेऊरकर, सागर गव्हाणे यांसह आदी उपस्थित होते. तर यावेळी ज्येष्ठ महिलांनी दाखवलेल्या प्रेमामुळे आ. पवार यांच्यासह पदाधिकारी देखील भरवून गेले.