केंद्रीय अर्थसंकल्पातील सप्तर्षीवरून रोहित पवारांना झाली अजित पवारांच्या पंचसूत्रीची आठवण, म्हणाले…

‘सप्तर्षी’वरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (Rashtrawadi Congress) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी टोला लगावला आहे.

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 2023-24 चा अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर केला.  या अर्थसंकल्पात देशाच्या विकासासाठी निर्मला सीतारमण यांनी सात प्राथमिकतांचा उल्लेख केला आहे. त्याला ‘सप्तर्षी’ असं नाव देण्यात आलं आहे. याच ‘सप्तर्षी’वरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (Rashtrawadi Congress) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी टोला लगावला आहे.

    ट्विट करत रोहित पवार म्हणाले, “गेल्या अर्थसंकल्पात पंचसूत्रीचा वापर करत अर्थसंकल्पाची फ्रेम कशी असावी, याचा उत्तम दाखला तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांनी दिला होता. याचाच संदर्भ केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही ‘सप्तर्षी’ वापरताना घेतला असावा. पण, अजित पवारांनी ठोस तरतुदी केल्या, तशा ‘सप्तर्षी’मध्ये दिसत नाहीत.”

    “केवळ करपात्र उत्पन्नात सवलत व भांडवली खर्चात वाढ, याच जमेच्या बाजू दिसतात. परंतु, गत सात वर्षांप्रमाणे केवळ तरतूद करून चालणार नाही. तर, प्रत्यक्ष भांडवली खर्चही करायला हवा. तरच अर्थव्यवस्थेला गती मिळेल. करसवलतीचा लाभ घेण्यासाठी लोकांचं उत्पन्न वाढण्याठीही प्रयत्न करण्याची गरज होती,” असं रोहित पवार यांनी म्हटलं.

    “भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला युवा वर्ग, बळीराजा, कामगार, असंघटित क्षेत्र यंदाच्या अर्थसंकल्पात दिसत नाही. पुढच्या वर्षी निवडणुका असूनही यंदाच्या अर्थसंकल्पात गतवर्षीप्रमाणे लोकप्रिय घोषणा झाल्या नाहीत. याचाच अर्थ सरकारला देशाच्या आर्थिक वास्तवाची जाण झालेली दिसते,” असेही रोहित पवारांनी सांगितलं.