‘भ्रष्टाचारी खेकड्याची नांगी ठेचल्याशिवाय राहणार नाही’, खेकडा प्रकरणानंतर रोहित पवार यांचा आक्रमक पवित्रा

मी भ्रष्टाचारी खेकड्याची नांगी ठेचल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा आमदार रोहित पवार यांनी घेतला आहे.

    पुणे – पुण्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये आणलेला जिवंत खेकड्यावरुन रोहित पवार चर्चेच्या वर्तुळामध्ये आले आहेत. रोहित पवार यांनी जिवंत खेकडा आणल्यामुळे भाजपने त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच रोहित पवार व शरद पवार यांना पत्र देखील लिहिले. यानंतर आता या प्रकरणावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला असून मी भ्रष्टाचारी खेकड्याची नांगी ठेचल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा आमदार रोहित पवार यांनी घेतला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एमपीएल लिलाव प्रक्रियेदरम्यान रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

    जो खेकडा राज्याची तिजोरी फोडतोय

    रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये खेकडा प्रकरणावर भाष्य केले. आमदार पवार म्हणाले, “मी आणलेला खेकडा हा हॉटेलमधील होता. तो पुन्हा नदीत सोडण्यात आला. या संदर्भात पेटा संस्था आपले काम करत आहे. या प्रकरणात मला अद्याप कुठलीही नोटिस मिळालेली नाही. मी आणलेल्या खेकड्याविषयी चर्चा करण्यापेक्षा जो खेकडा राज्याची तिजोरी फोडतोय त्याबद्दल बोला. मी भ्रष्टाचारी खेकड्याची नांगी ठेचल्याशिवाय राहणार नाही,” अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी मांडली. पुढे त्यांनी प्रवीण माने यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले, “बारामतीत मतदार संघात सुप्रिया सुळेंचे प्रचारप्रमुख प्रवीण माने यांनी अजित पवारांबरोबर जाण्याचा घेतलेला निर्णय मनापासून घेतला, की त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात आली हे पहावे लागेल. अर्थात, अशा छोट्या प्रकरणांनी बारामती डगमगणार नाही. बारामती सुप्रिया सुळेंच्याच मागे राहील आणि सुप्रिया ताई पूर्वीपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येतील,” असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.

    त्यांना तपास यंत्रणांची भीती

    तसेच शरद पवार गटातील एकनाथ खडसे हे भाजपमध्ये पुन्हा एकदा प्रवेश करणार आहेत. यावरुन रोहित पवार म्हणाले, “खडसे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. सध्या ते वैयक्तिक अडचणीत सापडले आहेत. मध्यंतरी त्यांची प्रकृती देखिल खालावलेली होती. सध्या भाजपाकडून अनेक राजकीय नेत्यांना अटकेची धमकी देऊन पक्षात घेतले जात आहे. असाच प्रकार खडसेंबाबतीतही झाला. त्यांना तपास यंत्रणांची भीती दाखवण्यात आली. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सत्तेत घेण्याचा निर्णय हा ब्लॅकमेलिंगचाच एक प्रकार आहे. राष्ट्रवादीतल्या या नेत्यांना भाजपकडून धमकावण्यात आले होते. त्यामुळे त्यांना अटकेची भीती होती म्हणूनच हे सर्व भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले,” असल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.