भावुक सुनेत्रा पवारांबाबत रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया: म्हणाले, “डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…”

शरद पवार यांच्या या प्रत्युत्तरावर सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. यानंतर या प्रकरणावर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    बारामती – बारामतीमध्ये लोकसभा निवडणूक रंगणार असून प्रचारामध्ये देखील आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्याचबरोबर भावनिक आवाहन देखील केले जात आहे. यंदाची लोकसभा निवडणूक पवार कुटुंबामध्येच होणार असल्याने राजकारण रंगले आहे. सुप्रिया सुळे या मुळ पवार आणि सुनेत्रा पवार या बाहेरून आलेल्या पवार या आशयाच्या शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे बारामतीमध्ये राजकीय नाट्य रंगले आहे. शरद पवार यांच्या या प्रत्युत्तरावर सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. यानंतर या प्रकरणावर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    सुनेत्रा पवार या भावूक झाल्यामुळे अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली तसेच शरद पवार यांच्या भूमिकेचा महायुतीच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून विरोध देखील करण्यात आला. या प्रकरणावर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारावेळी रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “अजित पवारांनी भाजपाच्या नादी लागून वडिलांप्रमाणे असलेल्या शरद पवारांना सोडलं, हे लोकांना अजिबात पटलेलं नाही. अजित पवार याबाबत जसं जसं विधानं करत जातील, तसं तसं सुप्रिया सुळेंचे मताधिक्य वाढत जाईल,” असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.

    पुढे रोहित पवार म्हणाले, “सुनेत्रा पवार भावूक झाल्याचे मला कळले. भावूक झालेल्या व्यक्तीबाबत मी काही बोलणार नाही. ही विचारांची लढाई आहे. भाजपाबरोबर गेलेल्या नेत्यांनी भाजपाचा विचार स्वीकारला आहे. आम्ही लहानपणापासून शरद पवार यांना भाजपाच्या विरोधात लढताना पाहत आलो आहोत. कुणाच्या डोळ्यात पाणी आले त्यापेक्षा भाजपाला हद्दपार करायचे आहे, असे लोकांनी ठरविले आहे,” असे ठाम मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.