पार्थ पवारांच्या राज्यसभा उमेदवारीवर रोहित पवारांची उपरोधिक टीका; म्हणाले, विचारवंत  राज्यसभेवर…’

अजित पवार गटाकडून सुनील तटकरे, समीर भुजबळ व पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा आहे. यावर आता शरद पवार गटातील नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    पुणे : राज्यामध्ये सध्या सर्व पक्षांचे राज्यसभा उमेदवार (RajyaSabha candidate) जाहीर केले जात आहेत. महायुतीकडून अद्याप चार उमेद्वारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटातील (Shinde group) एक तर भाजपमधील (BJP) तीन असे उमेदवार महायुतीमधून राज्यसभेसाठी दिले जाणार आहे. मात्र अजित पवार गटातील (Ajit Pawar group) एकही राज्यसभा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. काल अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांमधील बैठकीमध्ये देखील निर्णय झालेला नाही. मात्र अजित पवार गटाकडून सुनील तटकरे (Sunil Tatkare), समीर भुजबळ (Sameer Bhujbal) व पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या नावाची चर्चा आहे. यावर आता शरद पवार गटातील नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    शरद पवार गटातील नेते रोहित पवार यांनी पहिल्यांदाच पार्थ पवार यांच्यावर टीका केली आहे. पार्थ पवार यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात यावी या मागणीने राष्ट्रवादी पक्षामध्ये जोर धरला आहे. याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर रोहित पवार म्हणाले, राज्यसभेवर अभ्यासू लोकांना पाठवलं जातं. पार्थ पवार हे त्या पद्धतीचे उमेदवार आहेत. एखादा विचारवंत राज्यसभेवर गेल्याने जर राज्याचा आणि देशाचा फायदा होईल असं जर अजित पवारानं वाटत असेल तर ते पार्थ यांना पाठवतील. हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

    पुण्यामध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार गटातील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमधून शरद पवार गट कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले, कोणी तरी नेता येतो आणि काहीही सांगतो. आम्ही बैठकीत होतो. तिथे अशी कोणतीच चर्चा झाली नाही. आम्ही शरद पवार यांच्यामुळेच निवडून आलो आहोत. त्यामुळे सत्ता नसताना त्यांना सोडणं योग्य नाही. नाही तर आम्हाला आमच्या घरचेही माफ करणार नाहीत, असे स्पष्ट मत रोहित पवार यांनी व्यक्त केले. तर देवेंद्र फडणवीसांवर बोलून वेळ घालवायचा नाही. देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे असा घणाघात देखील रोहित पवार यांनी केला आहे.