राज ठाकरेंच्या भाजप पाठिंब्यावर रोहित पवारांचा टोला; म्हणाले, “तंबाखूच्या पुडीवर…”

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील राज ठाकरे यांच्या भाजपला पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे.

    बारामती – आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये राजकीय वादंग निर्माण झाला आहे. रोज नवनवीन नाट्य रंगले असून जोरदार प्रचार चालू आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यामध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून विरोधकांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. याचबरोबर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील राज ठाकरे यांच्या भाजपला पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे.

    काय म्हणाले राज ठाकरे?

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा जोरदार रंगल्या होत्या. यानंतर राज ठाकरे काय भूमिके घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.पाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे म्हणाले, मी सगळ्या गोष्टींकडे बारकाईने पाहतो तेव्हा पुढच्या पाच वर्षांसाठी काही गोष्टी ठरवाव्या लागतील. मी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं राज्यसभाही नको, विधान परिषद नको. पण देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देते आहे हे मी जाहीर करतो असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. आता विधानसभेच्या तयारीला लागा, पुढच्या गोष्टी पुढे होतील असे सूचक वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. त्यांच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.

    काय आहे रोहित पवार यांची पोस्ट?

    शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरे यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी लिहिले आहे की, ‘आरोग्यास हानिकारक आहे’, असं लिहिलेलं असतानाही तंबाखू खाण्याची अर्थातच ‘कळतं पण वळत नाही’ अशी भूमिका का घेतली जातेय? हे सांगता येणार नाही, पण राज्यातील एका स्वायत्त आवाजाने आपली स्वायत्तता गमावली, हे बघून मराठी मनं नक्कीच दुखावली असतील! अशी खोचक टीका रोहित पवारांनी केली आहे. यावर मनसेकडून काय प्रतिक्रिया देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.