"Yes, Yogesh Sawant is our worker; why is he acting like that?" Rohit Pawar's attack on Ram Kadam in Vidhan Bhavan, read in detail

  Rohit Pawar on Ram Kadam : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच मनोज जरांगेंच्या एसआयटी चौकशीवरून पुन्हा राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर जरांगेंच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्याचे विधान भवनात पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
  सोशल मीडियावरील पोस्टवरून विधानसभेत वातावरण तापले
  मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांवरून पहिल्या दोन दिवसांमध्ये मोठा वादंग झाल्यानंतर आता योगेश सावंत नामक व्यक्तीच्या सोशल पोस्टवरून पुन्हा एकदा राजकीय कलगीतुरा रंगल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात आज विधानसभेत भाजप आमदार राम कदम व आशिष शेलार यांनी आगपाखड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्यावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.
  कोण आहे योगेश सावंत?
  भाजपा आमदार राम कदम यांनी योगेश सावंत यांच्या एका सोशल पोस्टचा संदर्भ देत त्यात देवेंद्र फडणवीसांना संपवण्याची भाषा केल्याचा दावा केला. “एका व्हायरल क्लिपमध्ये राज्यात जातीवाद पसरवण्याचे षडयंत्र दिसत आहे. व्हिडीओत एक इसम म्हणतो की, ‘देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्राच्या मातीत गाडणार. देवेंद्र फडणवीससारखे तीन मिनिटांत महाराष्ट्रातले आख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू’. याचं नाव आहे योगेश सावंत. याचे सबंध बारामतीहून आहे. तिथल्या वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना शरद पवार गटाचा आमदार व शरद पवारांचा नातू रोहित पवार फोन करून योगेश सावंतला सोडायला सांगतो. काय संबंध आहे रोहित पवारचा?” असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला.
  विजय वडेट्टीवार यांनी घेतला आक्षेप
  राम कदम यांनी शरद पवार व रोहित पवार यांची नावं घेतल्याबाबत विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला. मात्र, आशिष शेलारांनी शरद पवारांचं नाव घेतलंच नसल्याचा दावा केला. तसेच, या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, अशी मागणी केली. त्यावर तालिका अध्यक्षांनी तपासाचे आदेशही दिले. मात्र, सत्ताधारी आमदारांच्या या दाव्यांवर रोहित पवार यांनी परखड शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
  रोहित पवार म्हणतात, “योगेश सावंत आमचा कार्यकर्ता”
  रोहित पवारांनी विधान भवन परिसरात माध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. “पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला आणलं होतं. त्याचा जबाब घेतला. आता त्याला कोर्टात नेत आहेत. मी त्याला स्वत: भेटण्यासाठी चाललो आहे. उगाच सत्ताधाऱ्यांनी तिथे अ‍ॅक्टिंग करू नये. जाहीरपणे सांगतोय ना, तो आमचा कार्यकर्ता आहे”, असं रोहित पवार म्हणाले.
  “फडणवीसांना खूश करण्यासाठी भाजपा आमदार आक्रमक”
  “त्यानं काय चूक केली? कुठल्यातरी यूट्यूब चॅनलने एका सामाजिक कार्यकर्त्याची मुलाखत घेतली होती. ती फक्त त्यानं सोशल मीडियावर त्याच्या पेजवर टाकली होती. तुम्ही त्या यूट्यूब चॅनलवर कारवाई करत नाही. जो पत्रकार तिथे होता, त्यानं परवानगी घेऊन मुलाखत घेतली किंवा नाही यावर मी काही बोलणार नाही. पण त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, मात्र या कार्यकर्त्यावर कारवाई केली जाते. त्यामुळे भाजपच्या आमदारांनी मांडलेला प्रश्न कदाचित मांडण्यासाठी नव्हता तर देवेंद्र फडणवीसांना खूश करण्यासाठी होता”, असा टोला रोहित पवारांनी लगावला.
  “तीन दिवसांपूर्वी एक बैठक झाली होती. त्या बैठकीत देवेंद्र फडणवीस चिडले होते की भाजपच्या आमदारांपैकी कुणीही त्यांच्या बाजूने बोलले नाही. त्या दिवसांपासून आतापर्यंत पाहिलं तर त्यांच्या प्रत्येक भाषणात सामान्य माणूस कुठेही दिसत नाही, पण देवेंद्र फडणवीस मात्र नक्की दिसतात. त्यामुळे एखाद्या नेत्याला खूश करण्यासाठी तुम्ही उगाच एखाद्या कार्यकर्त्याची नावे घेत असाल, त्यांच्यावर कारवाई करीत असाल तर आम्ही तरी शांत बसणार नाही” अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.