मिनीट्रेन शटलच्या फेऱ्या वाढणार; नेरळ-माथेरान सेवेसाठी काही महिन्यांची प्रतिक्षा

मुंबई व पुण्यापासून जवळचे पर्यटनस्थळ असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात माथेरानला पसंती देतात. वर्षाकाठी लाखो पर्यटक येतात. त्यातील खास आकर्षण असलेली मिनिट्रेन ही पर्यटकांची पहिली पसंती. सध्या माथेरानमध्ये उन्हाळी पर्यटन हंगाम सुरू आहे. पर्यटक संख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने अमन लॉज ते माथेरान शटल सेवेच्या बोगी कमी पडत आहेत, तसेच फेऱ्यासुद्धा अपुऱ्या पडत आहेत.

  माथेरान : पर्यटनस्थळ (Tourist Place) अशी जागतिक दर्जाचे ओळख असलेलं माथेरानचे पर्यटन (Matheran Tourism) आणखी खुलावं यासाठी माथेरानकरांच्या वतीने मिनीट्रेन शटल सेवा (MiniTrain Shuttle Service) आठ बोगीची करावी, तसेच फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल (Shalabh Goyal, Divisional Manager, Central Railway) यांच्याकडे केली आहे. यासाठी मध्ये रेल्वे सकारात्मक असून नेरळ माथेरान सेवेसाठी (Neral Matheran Service) अजून काही महिन्यांची प्रतिक्षा करावी लागेल असे यावेळी सांगण्यात आले.

  मुंबई व पुण्यापासून जवळचे पर्यटनस्थळ असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात माथेरानला पसंती देतात. वर्षाकाठी लाखो पर्यटक येतात. त्यातील खास आकर्षण असलेली मिनिट्रेन ही पर्यटकांची पहिली पसंती. सध्या माथेरानमध्ये उन्हाळी पर्यटन हंगाम सुरू आहे. पर्यटक संख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने अमन लॉज ते माथेरान शटल सेवेच्या बोगी कमी पडत आहेत, तसेच फेऱ्यासुद्धा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे बहुतांश पर्यटकांचा पुरता हिरमोड होत आहे. याबाबत काही पर्यटकांनी नाराजीही व्यक्त केली.

  मध्य रेल्वे सकारात्मक

  येथील पर्यटकांना निसर्ग पर्यटनासह मिनिट्रेनचा आनंदही मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष अजय सावंत, शिवसेना संपर्क प्रमुख तथा माजी बांधकाम सभापती प्रसाद सावंत, माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी, तसेच माजी नगरसेवक कुलदीप जाधव यांनी मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांची मुंबई येथे त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.

  मिनिट्रेन शटल सेवा ही सहा बोगी लावून फेऱ्या सुरू असतात. त्या सहा बोगीपैकी दोन बोगी मालवाहतुकीच्या, एक बोगी प्रथम श्रेणी आणि फक्त तीन बोगी द्वितीय श्रेणीच्या आहेत. एक बोगीमध्ये तीस पर्यटक प्रवास प्रवास करू शकतात. त्यामुळे एका फेरीत फक्त ९० प्रवासी प्रवास करतात. अशा एकूण १० फेऱ्या सुरू आहेत. त्यामुळे फक्त ९०० प्रवासी एक दिवसाला प्रवास करतात. या पर्यटन हंगामात दिवसाला चार ते पाच हजार पर्यटक येत आहेत. त्यामुळे बोगीची आसन व्यवस्था कमी पडत असल्या कारणाने सहाऐवजी आठ बोगी जोडाव्यात, तसेच फेऱ्या सुद्धा वाढवाव्यात, अशी मागणी लेखी पत्राद्वारे केली आहे.

  युद्धपातळीवर काम सुरू

  दरड कोसळणे, जास्त पावसामुळे रुळाखालची जमीन वाहून जाणे, तसेच काही वेळा इंजिन, तसेच बोगी रुळावरून उतरण्याच्या घटना झाल्यामुळे मध्य रेल्वेने नेरळ-माथेरान मिनिट्रेनच्या फेऱ्या अनिश्चित काळासाठी बंद ठेवल्या आहेत. ही सेवा सुरू होण्याबाबत सुद्धा विभागीय व्यवस्थापक यांच्याशी चर्चा झाली. माथेरान घाटात लोखंडी स्लीपर काढून सिमेंट स्लीपर बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रुळांना जोडण्याचे कामही सुरू आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर दसरा सणाच्या दिवशी ही सेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत, अशी माहिती प्रसाद सावंत यांनी दिली.

  माथेरानला वाढती पर्यटक संख्या पाहता मिनीट्रेन शटल सेवेच्या फेऱ्या फारच अपुऱ्या पडत असून पर्यटकांचा हिरमोड होत आहे. याबाबत पर्यटकांच्या तक्रारीसुद्धा आल्यामुळे आम्ही मुंबई येथे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांची भेट घेतली व फेऱ्या आणि बोगी वाढविण्याची मागणी केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत फेऱ्या लवकरच वाढवू असे सांगितले. त्यामुळे पर्यटकांचे माथेरान पर्यटन रंजक होणार आहे.

  – अजय सावंत, माजी नगराध्यक्ष