उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपी शमीम अहमदची माहिती देणाऱ्यास २ लाखांचे बक्षीस

उमेश कोल्‍हे हे महिला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येताच हल्‍लेखोरांनी दुचाकीवरून उतरून उमेश यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून घटनास्थळावरून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात उमेश रस्त्यावर पडले. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्‍यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला.

    अमरावती – औषधी व्‍यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपी शमीम अहमद उर्फ ​​फिरोज अहमद याची माहिती देणाऱ्यास राष्ट्रीय तपास संस्थेने एनआयए दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. याप्रकरणी तपास यंत्रणा एनआयएने आतापर्यंत दहा आरोपींना अटक केली आहे.

    वादग्रस्‍त नुपूर शर्माच्या समर्थनार्थ समाज माध्‍यमावर संदेश प्रसारीत केल्‍यामुळे उमेश कोल्‍हे यांची हत्‍या करण्‍यात आली होती. ५४ वर्षीय उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची गेल्‍या २१ जून रोजी हत्या झाली होती. अमरावती पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. उमेश कोल्‍हे हे दुकान बंद करून दुचाकीवर घरी परतत असताना ही घटना घडली होती. उमेश कोल्‍हे हे महिला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येताच हल्‍लेखोरांनी दुचाकीवरून उतरून उमेश यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून घटनास्थळावरून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात उमेश रस्त्यावर पडले. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्‍यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला.

    एनआयएने २ जुलै रोजी गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार कलम १२० ब (गुन्हेगारी कट रचण्यासाठी), ३०२ (हत्या ), १५३ अ (धर्म, जात, स्थळाच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास आता एनआयए करत असून आतापर्यंत दहा आरोपींना अटक करण्‍यात आली आहे. शमीम अहमद मात्र अद्यापही फरार आहे.