
मध्यप्रदेशच्या हरदा येथे विहिरीत मिळालेला मृतदेह भाजप नेत्या सना उर्फ हिना खान (Sana Khan) यांचा असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, कुटुंबीयांनी तो मृतदेह सनाचा नसल्याचे म्हटले आहे. पोलिस खबरदारी म्हणून डीएनए तपासणी करण्याच्या तयारीत आहेत.
नागपूर : मध्यप्रदेशच्या हरदा येथे विहिरीत मिळालेला मृतदेह भाजप नेत्या सना उर्फ हिना खान (Sana Khan) यांचा असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, कुटुंबीयांनी तो मृतदेह सनाचा नसल्याचे म्हटले आहे. पोलिस खबरदारी म्हणून डीएनए तपासणी करण्याच्या तयारीत आहेत. डीएनए तपासणीनंतरच हरदा येथे मिळालेला मृतदेह सनाचा आहे किंवा नाही हे स्पष्ट होईल. दरम्यान, सनाची आई मेहरूनिसा यांनी प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे आणि आरोपी पप्पू शाहूला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
सनाची आई मेहरूनिसा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, जबलपूर पोलिसांनी सुरुवातीपासूनच प्रकरण गांभीर्याने घेतले नाही, मात्र, नागपूर पोलिसांनी तपास केला. प्रकरण नोंद करण्यासोबतच मानकापूर पोलिसांनी आरोपी पप्पू शाहू आणि त्याचा साथीदार राजेश सिंह याला अटक केली. बुधवारी आम्हाला माहिती मिळाली की, हरदामध्ये एक मृतदेह मिळाला आहे. पोलिसांचे एक पथक जबलपूरमध्येच होते. त्यांचा मुलगाही जबरलपूरलाच होता. त्यामुळे तत्काळ सर्व हरदा येथे पोहोचले.
पोलिसांनी जे फोटो त्यांना दाखविले त्यावरून तो मृतदेह सनाचा नाही. सना कधीच आपले नख मोठे ठेवत नव्हती. टेन्शनमध्ये ती दातांनी नखे कुरतडत होती. ती नखांना कधी नेलपॉलिशही लावत नव्हती. आजकाल प्रत्येक दुसरी तरुणी पायाला काळ्या रंगाचा धागा बांधते. पायाची बोटे आणि हात पाहून तर मृतदेह सनाचा वाटत नाही. मात्र, पोलिसांनी डीएनए तपासणीचा निर्णय घेतला आहे.
पप्पूला जबलपूरच्या एका नेत्याचे संरक्षण
पप्पूने या आधीही खून केला आहे. त्या प्रकरणात अनेक दिवस तो फरार होता. जर त्यावेळी पप्पूला शिक्षा मिळाली असती तर तो तुरुंगात असता. त्यांच्या मुलीसोबत जे घडले ते कोणासोबतही घडू नये. पप्पू शाहूला समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. तो समाजासाठी धोकादायक आहे. त्याला जबलपूरच्या एका नेत्याचे संरक्षण आहे. त्यामुळेच स्थानिक पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. नागपूर पोलिस सक्रिय झाल्यानंतर जबलपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.